सांगोला प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सांगोला येथे शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताई लॉन्स, कडलास रोड, सांगोला येथे होणाऱ्या या परिषदेत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी, शिक्षण हक्काची सद्यस्थिती तसेच शिक्षकांच्या सेवेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर व्यापक विचारमंथन होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ भाऊ चासकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पुणे विभागातील संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाज, शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि भविष्यातील भूमिका याबाबत मार्गदर्शन या शिबिरातून मिळणार आहे.
या कार्यकर्ता उद्बोधन शिबिरासाठी शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे , महासचिव राजन कोरगांवकर , राज्य महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , आनंदा कांदळकर , विलास कंटेकुरे कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील , कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर , विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्यासह राज्यभरातील शिक्षक समितीचे विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिक्षणाच्या सद्यस्थितीवर होणार चर्चा
कार्यकर्ता उद्बोधन शिबिरानंतर दुसऱ्या सत्रात शिक्षण हक्क परिषद होणार आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर आणि विदारक परिस्थितीवर चिंतन व्हावे, शिक्षणाचा मूलभूत हक्क अधिक प्रभावीपणे जपला जावा आणि शिक्षक, पालक तसेच समाजातील विविध घटकांमध्ये शैक्षणिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते होणार असून, माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिक्षणतज्ज्ञ भाऊ चासकर हे “शिक्षण हक्काचं काय झालं?” या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क, शाळांसमोरील आव्हाने, शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय भार आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसमोरील प्रश्न यावर ते आपले विचार मांडणार आहेत.
TET परीक्षेबाबतही भूमिका
प्रचलित शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या स्वरूपाबाबतही या परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी टीईटी परीक्षेच्या रचनेत कोणते संरचनात्मक बदल करता येतील, याबाबत भाऊ चासकर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांच्या दृष्टीने या विषयावरील मांडणी महत्त्वाची ठरणार आहे.
शिक्षकांच्या सेवेशी संबंधित प्रश्न, शैक्षणिक धोरणांमधील बदल आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील संबंध यांसारख्या विषयांवरही परिषदेत विचारविनिमय होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण हा केवळ नोकरी किंवा प्रशासकीय व्यवस्थेचा विषय नसून समाजाच्या भवितव्याशी जोडलेला महत्त्वाचा घटक असल्याने या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘चक्रव्यूहात शिक्षण’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिक्षक समितीचे माजी राज्य संपर्कप्रमुख सुरेश पवार यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘चक्रव्यूहात शिक्षण’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन. मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्न आणि अनुभवांवर आधारित या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनामुळे शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा कार्यक्रम विशेष ठरणार आहे. शिक्षण व्यवस्थेतील वास्तव परिस्थितीवर चर्चा घडवून आणण्यासाठी पुस्तक प्रकाशनाला परिषदेत स्थान देण्यात आले आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान सांगोला तालुक्यातील विविध नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचाही सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, सभापती सौ. पुनमताई इंगवले, उपसभापती अजय सरगर यांच्यासह नूतन सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.
या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्याने जबाबदारी स्वीकारलेल्या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राशी संबंधित स्थानिक प्रश्नांवर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींचा सहभाग
या परिषदेस शिक्षक नेते अनिल कादे, आटपाडीचे नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार, पालक सभा व शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न केवळ शिक्षकांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि समाजातील प्रत्येक घटक त्याच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे सर्व घटकांनी या परिषदेत सहभागी होऊन शिक्षणाच्या भवितव्याबाबत आपले विचार मांडावेत आणि चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
आयोजनासाठी शिक्षक समितीची जोरदार तयारी
शिक्षण हक्क परिषद आणि कार्यकर्ता उद्बोधन शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा तसेच सांगोला तालुका शाखेतील शिक्षक समितीचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. पुणे विभागातील विविध तालुक्यांमधून शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सकाळच्या सत्रात संघटनात्मक मार्गदर्शन आणि दुपारच्या सत्रात शिक्षणाच्या व्यापक प्रश्नांवर विचारमंथन, असा या कार्यक्रमाचा दुहेरी उद्देश आहे. त्यामुळे शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांसोबतच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांसाठी ही परिषद महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
पुणे विभागातील, सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील शिक्षकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांगोला तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब पांढरे आणि सरचिटणीस दत्तात्रय शिंदे सर यांनी केले आहे.
शिक्षण हक्क, शिक्षकांचे प्रश्न आणि बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेवर एकत्रितपणे चर्चा घडवून आणणाऱ्या या परिषदेमुळे सांगोल्यात शिक्षणविषयक विचारमंथनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
