सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तेल कंपन्यांनी जिल्ह्याला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा, तसेच ग्रामीण व शहरी भागात दैनंदिन मागणीनुसार इंधनपुरवठा सुरळीत राखावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 25 मे रोजी पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव व संजयकुमार, एचपीसीएलचे सागर चव्हाण व निकीत रेड्डी, आयओसीएलचे सागर गौतम व तन्मय आनंद तसेच आयएमसीएल कंपनीचे नंदकिशोर अडसुळे व अनिल करीर उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल व गॅस साठा, दैनंदिन मागणी, वितरण व्यवस्था आणि संभाव्य अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः काही पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन विक्री करण्याबाबत तक्रारी आल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी तेल कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला की, जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही विक्रेत्यावर इंधन विक्रीबाबत निर्बंध लागू करू नयेत.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, इंधन विक्रीवर अनावश्यक बंधने घालण्यात आल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व कंपन्यांनी सोलापूर शहरासह ग्रामीण भागात इंधनपुरवठा नियमित ठेवण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी. यापुढे कृत्रिम टंचाई निर्माण होईल किंवा पुरवठा खंडित होईल अशा प्रकारच्या तक्रारी येऊ नयेत, याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. “जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन उपलब्ध असून कंपन्यांकडून रोजच्या मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अनावश्यक अतिरिक्त साठा करून ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
सीएनजी गॅसच्या वाढत्या मागणीचा विचार करता, कंपन्यांनी त्याचा पुरवठाही अधिक वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी किमान सात दिवसांचा पेट्रोल आणि डिझेल बफर स्टॉक उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दैनंदिन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक व डीलर्सना भेडसावणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. ग्राहकांना कोणताही त्रास न होता पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विक्रेत्यांना दिले.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी बैठकीत ग्रामीण भागातून येणाऱ्या काही गंभीर तक्रारींचा उल्लेख केला. काही पेट्रोल पंपांवर ड्रममध्ये किंवा एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे काळाबाजाराची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अक्कलकोट, करमाळा आणि बार्शी तालुक्यांत इंधनपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी येत असल्याने त्या भागातील पंपांना प्राधान्याने पुरवठा करण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी आज पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपाची अचानक तपासणी केली. काही ठिकाणी इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी, तसेच शॉर्ट सेलिंगसारख्या प्रकारांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित पेट्रोल पंपावर सर्व बाबी व्यवस्थित असल्याचे आढळून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यावर सतत लक्ष ठेवावे. नियमित तपासण्या करून ग्राहकांना सुरळीत इंधनपुरवठा होईल याची खात्री करावी. पेट्रोल पंपांवरील वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून कोणतीही गैरप्रकाराची घटना घडू नये, यासाठी महसूल व प्रशासन यंत्रणांनी सजग राहण्याचे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान, पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी वाढणाऱ्या गर्दीमुळे काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय संयुक्त भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांमध्ये तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, तर पोलिस निरीक्षक कायदा व सुव्यवस्था प्रमुख म्हणून कार्यरत राहतील. निरीक्षक अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे तांत्रिक तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक, सहाय्यक महसूल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचाही पथकात समावेश करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपांवरील मोजमापाची अचूकता तपासण्यासाठी वजन व मापे विभागालाही सक्रिय करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी उपायुक्त, वजन व मापे विभाग यांना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांचे कॅलिब्रेशन (अचूकता तपासणी) व्यवस्थित झाले आहे की नाही याची विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या पंपांवर मोजमापात त्रुटी आढळतील, ते तातडीने दुरुस्त करून ग्राहकांना योग्य प्रमाणात इंधन मिळेल याची खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या या हालचालींमुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहील, तसेच कृत्रिम टंचाई, काळाबाजार आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
