पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी दाखल झाले असताना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी विविध स्तरांवर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकप्रिय आमदार तथा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ आणि संत तुकाराम महाराज पालखी तळ, येथे प्रत्यक्ष भेट देऊन वारकऱ्यांच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच वैद्यकीय सेवांचा आढावा घेतला.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी, यांच्या माध्यमातून यंदाही वारीत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्यसेवा राबविण्यात आली. वारकऱ्यांना वेळेवर उपचार, आरोग्य तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक कार्यरत ठेवण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध झाली.
यावेळी आमदार डॉ. देशमुख यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांची सविस्तर माहिती घेतली. शासनाने उभारलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या उपचारांबाबत माहिती घेतली तसेच तेथील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही केले.
वारकरी संप्रदायातील भाविकांची संख्या लक्षात घेता शासनाने उभारलेल्या आरोग्य सुविधा प्रभावीपणे कार्यरत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी वैद्यकीय यंत्रणेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध सूचनाही आमदार डॉ. देशमुख यांनी दिल्या. गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी समन्वय वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रालाही भेट दिली. या केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा, वैद्यकीय सेवा, विश्रांती व्यवस्था आणि आरोग्य सहाय्य यांची त्यांनी पाहणी केली. केंद्रातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
वारकरी सेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून त्यामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांनाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उन्हाचा तडाखा, पायांच्या समस्या, निर्जलीकरण, थकवा आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी वारकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याशिवाय विविध सामाजिक संस्था आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवांचाही त्यांनी आढावा घेतला. पादाभ्यंग, कांस्य थाळी फूट मसाज, चरणसेवा यांसारख्या सेवांमुळे लांबचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सेवा पुरविणाऱ्या स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच वारकऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणींबाबत माहिती घेतली.
वारीदरम्यान पायांचे विकार, स्नायू दुखणे, थकवा आणि उष्माघात यांसारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसोबतच अशा पूरक सेवाही वारकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे आमदार डॉ. देशमुख यांनी सांगितले. आरोग्य सेवा आणि सामाजिक सेवांचा समन्वय साधल्यास वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वतः उपस्थित राहून आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शन केल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपक्रमाचे स्वागत केले. वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी वारीत दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
या आरोग्य सेवा उपक्रमात डॉ. निरंजन केदार, डॉ. आगवणे मॅडम, अमर चव्हाण, शंकर माने, नवनाथ आदिलिंगे, सुशांत कोडक, सर्व आरोग्य सेवक तसेच येथील माजी आरोग्य सेवक आप्पा बाबर यांनी सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण वैद्यकीय पथकाने वारकऱ्यांना आवश्यक तपासणी, उपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देत सेवा बजावली.
याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी अत्यावश्यक ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध होती. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार केंद्रात किंवा रुग्णालयात हलविण्यासाठी ही सेवा सातत्याने सज्ज ठेवण्यात आली असून त्यामुळे आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक एकत्रितपणे काम करत आहेत. या सेवाकार्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने दिलेले योगदान वारकऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, “सेवेतूनच विठ्ठलाची खरी भक्ती” या भावनेला त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला आहे.
