अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात बोगस उडीद बियाण्यांच्या विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून कृषी विभागाने धडक कारवाई करत तब्बल ८ लाख ४६ हजार ७२० रुपयांची बनावट बियाण्यांची साठवण जप्त केली आहे. या कारवाईमुळे शेकडो शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टळली असून कृषी विभागाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मंगळवारी (दि. 26) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बोगस उडीद बियाण्यांच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळताच कृषी विभागाने तातडीने हालचाली सुरू करत छापेमारी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या उडीद वाण NUL-7 (विश्वास) या बियाण्यांच्या बॅगची हुबेहूब नक्कल करून विक्रीसाठी आणलेली मोठ्या प्रमाणावर बनावट बियाण्यांची साठवण आढळून आली.
तपासादरम्यान स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी बनावट बियाण्यांची विक्री करण्यासाठी बॅग तयार करून आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून ४८ बॅग (प्रत्येकी ५ किलो) बनावट उडीद बियाणे जप्त केली. यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत अक्कलकोट येथील आबा कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनमध्ये देखील तपासणी करण्यात आली. या गोडाऊनमध्ये आणखी ४३२ बॅग बोगस उडीद बियाणे साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.
दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ४८० बॅग बनावट बियाणे जप्त करण्यात आली असून त्याची बाजारमूल्य तब्बल ८,४६,७२० रुपये इतकी असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी दिली. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, या बियाण्यांच्या पिशव्या मूळ कंपनीच्या उत्पादनासारख्याच दिसत असल्याने शेतकऱ्यांची सहज फसवणूक होण्याची शक्यता होती. मात्र वेळेत माहिती मिळाल्याने हा मोठा गैरप्रकार उघडकीस आणण्यात यश आले.
विशेष म्हणजे, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर उडीद आणि इतर कडधान्यांच्या पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करत असतात. अशा वेळी बनावट बियाण्यांची विक्री झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कमी उगवणक्षमता, दर्जाहीन बियाणे किंवा चुकीचे वाण यामुळे उत्पादन घटण्याचा धोका असतो. त्यामुळे कृषी विभागाने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले आणि कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली. या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बी. बी. बाबर, कृषी अधिकारी अशोक कांबळे तसेच निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव नाटीकर यांनी सहभाग घेतला.
कृषी विभागाने जप्त केलेल्या बोगस बियाण्यांबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून संबंधित विक्रेत्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्ती, पुरवठादार आणि वितरण साखळीचा शोध घेत आहे. यामध्ये आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तत्परतेचे स्वागत केले असून अशा प्रकारच्या फसवणुकीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बियाण्यांच्या पिशव्यांवरील माहिती, कंपनीचे नाव, लॉट नंबर आणि पावती घेण्याबाबत खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारच्या तपास मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
