विशेष प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख शैक्षणिक संकुलातील काही प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत गंभीर आक्षेप नोंदविल्याचा दावा समोर आला आहे. संस्थेच्या प्रशासनाकडून मनमानी कारभार होत असून भरती, पदोन्नती आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हेकेखोर अध्यक्ष व मनमानी पद्धतीने कारभार करणारे सचिव ?
पुरोगामी विचारधारा आपल्या आयुष्यभराच्या समाजकारणात टिकवून ठेवण्यासाठी झटलेल्या स्व.डॅा.गणपतराव देशमुख यांच्या नंतर या संकुलात सध्या जातीय संघर्ष पेटतोय का असा सवाल करण्यात आला आहे ? याला जबाबदार हेकेखोर अध्यक्ष व मनमानी पद्धतीने कारभार करणारे सचिव जबाबदार असल्याचे संकुलात चर्चांनी जोर धरला आहे अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांनी सर्व समाजघटकांना समान संधी देण्याचे धोरण आयुष्यभर जपले. मात्र, सध्याच्या कारभारात त्या मूल्यांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी वर्गात नाराजी वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मनमानी पद्धतीने ठराविक समाजालाच डोळ्यासमोर ठेवून कारभार केला जात असून इतर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केल्याचे दिसून येत आहे.
बहुजन समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे धोरण जपले
डॅा.गणपतराव देशमुख यांनी कै.माणिकराव बाबर, कै.नारायणराव भगरे, कै.कुमठेकर मालक,कै.जगन्नाथराव लिगाडे,कै.वाघमोडे तात्या या सारख्या व्यक्तींना सोबत घेत बहुजन समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे धोरण आयुष्यभर जपले. मात्र या सर्वांच्या निधनानंतर संकुलात प्रचंड जातीयवाद वाढल्याचे बोलले जात आहे.
विशिष्ट समाजातील लोकांनाच नोकरीत सामावून घेणे, विशिष्ट समाजातील लोकांनाच इतर घटकांवर अन्याय करून पदोन्नती देणे, टीईटी घोट्याळा करणाऱ्या ही शिक्षिकेला संरक्षण देणे, नियमबाह्य पद्धतीने शासनाकडे खोटी कागदपत्रे सादर करून मान्यता घेणे,जुन्या पेन्शन योजनेत बसण्यासाठी प्राध्यापकांची खोटी कागदपत्रे तयार करणे, त्याचबरोबर नोकरी भरतीत निवृत्त लिपिकाच्या सहाय्याने भ्रष्टाचार करणे, विशिष्ट समाजासाठी सोईस्करपणे रोस्टर मध्ये बदल करणे, ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या प्राध्यापकांमध्ये जातीय वाद निर्माण करणे यासारख्या अनेक गोष्टी उघड झाले आहेत.
याला संस्थाअध्यक्ष व मनमानी पद्धतीने कारभार करणारे सचिव जबाबदार असल्याचे संकुलातील प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सांगत आहेत. हे प्रकार जर असेच चालू राहिले तर लवकरच जातीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारतां येणार नाही.
संकुलात जातीय संघर्षाचे रूपांतर होण्याची चिन्हे दिसू लागली असून यामुळे या संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून शैक्षणिक संकुल राजकारणाचा अड्डा झाला असल्याचे दिसत असल्याचे पालकांनी माहिती दिली.
संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी
दरम्यान, याबाबत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.दादासो भुसे यांच्याकडे संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी करणार सूत्रांनी माहिती दिली..
