पंढरपूर: परिसरातील नदीपात्रात पाणी आटल्यामुळे सांगोला शहराच्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना मर्यादित वेळेतच पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगोला नगरपरिषदेच्या जलनिस्सारण समिती व पाणीपुरवठा सभापती सौ. वैशालीताई सतीश सावंत यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन केले आहे.
त्या म्हणाल्या की, सध्याची पाणीटंचाई ही तात्पुरती असली तरी सर्वांनी जबाबदारीने पाण्याचा वापर केल्यास संकटाचा परिणाम कमी होऊ शकतो. अनावश्यक पाणी वाया घालवू नये, साठवण व्यवस्थित करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांवर काम सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
