Sangola Police Station
सांगोला प्रतिनिधी : सांगोला शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत सांगोला पोलिसांनी वाळूने भरलेला टाटा 407 टेम्पो पकडला आहे. या कारवाईत वाहनासह 6 लाख 7 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल मारुती दत्ता पांढरे, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक सांगोला परिसरात गस्त घालत होते.
पोलिसांचे पथक खासगी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती मिळाली. एका टाटा 407 टेम्पोमधून माण नदीच्या पात्रातून काढण्यात आलेली वाळू अवैधरीत्या वाहून नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित वाहन सांगोला शहराच्या दिशेने येत असल्याचेही पोलिसांना समजले
माहिती मिळताच पोलीस पथकाने संबंधित वाहनाचा शोध सुरू केला. दरम्यान, वासूद गावाकडून सांगोल्याच्या दिशेने एक टाटा 407 टेम्पो येताना पोलिसांना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता ते सांगोला शहराच्या दिशेने वेगाने धावू लागला.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करत वासूद रोडवरून सविता आयुर्वेद शॉपकडे जाणाऱ्या अंतर्गत कच्च्या रस्त्यावर वाहन वळवण्यात आले. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवत अखेर सविता आयुर्वेद शॉपच्या बाजूला संबंधित टाटा 407 वाहन अडवून पकडले.
वाहन ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चालकाकडे त्याचे नाव आणि पत्ता विचारला. चालकाने आपले नाव सुशील संजीव शिंदे असे सांगितले.
पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता त्याच्या पाठीमागील हौद्यात एक ब्रास वाळू भरलेली आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला रॉयल्टी परवाना तसेच अन्य कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र, संबंधित वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा रॉयल्टी असे काहीच नवते.
पोलिसांनी एकूण 6 लाख 7 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये 6 लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा 407 मॉडेल चारचाकी टेम्पो तसेच वाहनाच्या हौद्यात असलेली 7 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू यांचा समावेश होता
टेम्पोमध्ये आढळलेली वाळू माण नदीच्या पात्रातून काढण्यात आली . शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता तसेच आवश्यक परवानगी न घेता पर्यावरणाचा ऱ्हास करून वाळूचा उपसा केल्याचा आरोप करण्यात आला .पोलिसांनी वाहन आणि वाळू ताब्यात घेऊन सांगोला पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.
नैसर्गिक वाळूच्या अवैध उत्खननामुळे नदीपात्राच्या पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाकडून वाळू उत्खनन आणि वाहतुकीसाठी विविध नियम लागू करण्यात आले आहेत. संबंधित नियमांचे उल्लंघन करून वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळल्यास महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल
सांगोला तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाकडून सातत्याने कारवाई होते. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवैध वाहतुकीवरही पोलिसांची नजर असते. जर असेकाही आढळून आले तर प्रशासनाकडून कडक करवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे
