सांगोला | प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी, लोणारवाडी, गायगव्हाण, महिम आणि कारंडेवाडी या पाच गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यासंदर्भात सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने फलटण येथील निरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यवाहीचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणीटंचाई शाखेने संबंधित पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठवले होते. आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या निवेदनानुसार आवश्यक ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश या पत्रातून देण्यात आल्याचे समजते.
या प्रशासकीय पत्रव्यवहारामुळे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत आमदार देशमुख यांनी केलेल्या मागणीचा आणि पाठपुराव्याचा संदर्भ समोर आला आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांसाठी हा दिलासादायक निर्णय मानला जात आहे.
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्याची अपेक्षा
पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले पत्र या प्रकरणातील महत्त्वाचा दस्तऐवज ठरत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर राजकीय श्रेयवादापेक्षा नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.
खिलारवाडी, लोणारवाडी, गायगव्हाण, महिम आणि कारंडेवाडी येथील नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
https://www.instagram.com/reel/Deg1RDCNWIf/?utm_source=ig_web_copy_link&dlrf=MzRlODBiNWFlZA==&srtk=MzRlODBiNWFlZA==