मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा, संत साहित्याचा आणि पंढरपूर वारीच्या आध्यात्मिक वारशाचा जागतिक स्तरावर परिचय करून देणाऱ्या ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा भव्य प्रीमियर शो मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या माहितीपटाच्या प्रीमियरला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
या सोहळ्यास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, वारकरी परंपरेचे अभ्यासक आणि निमंत्रित उपस्थित होते.
माहितीपटाच्या प्रीमियरनंतर उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना हा माहितीपट केवळ पंढरपूर वारीचे चित्रण करणारा नसून वारकरी संप्रदायाची अध्यात्मिक परंपरा, संतांचा विचार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा प्रभावीपणे मांडणारा असल्याचे सांगितले. चित्रपट पाहताना जणू काही प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा अनुभव मिळत असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. वारीतील भक्तिभाव, टाळ-मृदुंगाचा निनाद, अभंगांची गोडी, दिंड्यांचा शिस्तबद्ध प्रवास आणि विठ्ठल भक्तांच्या अखंड श्रद्धेचे प्रभावी चित्रण माहितीपटात करण्यात आले असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्मितीचे कौतुक करताना महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी चळवळ आणि सामाजिक समतेचा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी अशा दर्जेदार माहितीपटांची आवश्यकता असल्याचे सांगितले. आधुनिक माध्यमांच्या सहाय्याने राज्याचा सांस्कृतिक वारसा अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या पंढरपूर वारीचा इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक संदेश नव्या पिढीपर्यंत तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा माहितीपट उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने राज्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला आहे. या उपक्रमांतर्गत वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माध्यम संस्थेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला हा माहितीपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरत आहे.
सुमारे २२ मिनिटांच्या या माहितीपटात पंढरपूर वारीची परंपरा, संतांच्या कार्याचा प्रभाव, वारकरी संप्रदायातील समता, भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश प्रभावी दृश्यांद्वारे सादर करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या विचारधारेतून घडलेली वारकरी परंपरा, लाखो भाविकांचा पदयात्रेचा प्रवास, दिंड्यांचे शिस्तबद्ध आयोजन, अभंग, कीर्तन आणि विठ्ठल भक्तीचा अनोखा अनुभव यांचे प्रभावी चित्रण माहितीपटात करण्यात आले आहे.
हा माहितीपट मराठीसह इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आला असून त्यामुळे देशभरातील आणि विविध भाषिक प्रेक्षकांपर्यंत महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा पोहोचणार आहे. विविध भाषांतील आवृत्त्यांचे प्रसारण वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या नेटवर्कवरील प्रमुख वाहिन्यांद्वारे करण्यात येत आहे.
माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अॅनिमल प्लॅनेट, अॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो या एकूण नऊ उपग्रह वाहिन्यांवर होणार असून त्यामुळे देशासह जगभरातील प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेची ओळख होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट छायांकन आणि प्रभावी मांडणीमुळे हा माहितीपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव देणारा ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
प्रीमियर शोदरम्यान उपस्थित मान्यवरांनी माहितीपट निर्मितीत योगदान देणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, संतांचा मानवतावादी संदेश आणि पंढरपूर वारीचे वैशिष्ट्य प्रभावी माध्यमातून जगासमोर मांडण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनालाही या माहितीपटामुळे नवी चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
पंढरपूर वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक समता, बंधुभाव, शिस्त, सेवा आणि भक्ती यांचे जिवंत प्रतीक आहे. या वैशिष्ट्यांचा प्रभावी दस्तऐवज म्हणून ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा माहितीपट राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे प्रीमियर सोहळ्यात अधोरेखित करण्यात आले.
