सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातील द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार 18 जून 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्राय डे घोषित केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, निवडणुकीदरम्यान मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू नये आणि सार्वजनिक शांतता राखली जावी यासाठी मद्यविक्री व मद्यसेवनाशी संबंधित सर्व परवानाधारक आस्थापनांवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये नमुना एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4 क्लब अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3, सीएल-एफएल/टीओडी-3, टिडी-1 तसेच तत्सम प्रकारच्या सर्व अनुज्ञप्तींचा समावेश आहे.
या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका हद्द, कुर्डूवाडी नगरपरिषद हद्द, पंढरपूर नगरपरिषद हद्द, मंगळवेढा नगरपरिषद हद्द आणि अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व मद्यविक्री दुकाने, बार, क्लब आणि संबंधित अनुज्ञप्तीधारक बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ही सर्व आस्थापना बंद राहतील.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या कालावधीत मद्यविक्रीवर पूर्णपणे नियंत्रण राहणार असून मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची मानली जात आहे. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने देणे, बेकायदेशीर मद्यविक्री करणे किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, मतमोजणीच्या दिवशीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित मद्यविक्री व मद्यसेवनाशी निगडित आस्थापना मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित सर्व अनुज्ञप्तीधारकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मद्यविक्री दुकाने, बार, क्लब तसेच इतर परवानाधारक संस्थांनी निर्धारित कालावधीत व्यवसाय बंद ठेवणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतात. तसेच कायद्याच्या कलम 54 आणि 56 नुसार संबंधित परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे सर्व परवानाधारकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक विभागाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
