सोलापूर : माढा तालुक्यातील गार अकोले परिसरात झालेल्या मुसळधार अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे केळी व डाळिंब या महत्त्वाच्या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी गार अकोले परिसराला भेट देत थेट शेतांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचेही त्यांनी सांगितले. पंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर करून नुकसानभरपाई प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
या पाहणीवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तालुका कृषी अधिकारी श्री. चंदन, नायब तहसीलदार विजय कवडे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडल अधिकारी भगवान मुंडे, तलाठी बाळासाहेब कांबळे, वैभव पाटील, श्री. बोऱ्हाडे तसेच कृषी विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी सांगितले की, अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे योग्य मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाकडे सादर होणारा अहवाल अचूक आणि वास्तव परिस्थितीवर आधारित असावा, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य मदत मिळू शकेल. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी या वेळी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील पंचनाम्यांचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही तातडीने पूर्ण केली जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात सुमारे 6 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या नुकसानीत विशेषतः केळी, डाळिंब, तसेच इतर फळबागांचा मोठा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गार अकोले परिसरात केळी लागवडीचे प्रमाण मोठे असून सुमारे 300 ते 400 एकर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे 2.50 ते 3 लाख रुपये इतका मोठा खर्च केला होता. मात्र अचानक आलेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यांमुळे या सर्व पिकांचे जवळपास 100 टक्के नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये केळीची झाडे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून उत्पादन हाती येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची जोरदार मागणी केली आहे. शेतकरी किसन देवकते, प्रकाश केचे, धनंजय वाळेकर, वामन देवकाते आणि अशोक केचे यांनी त्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यांनी सांगितले की, संपूर्ण वर्षभर केलेली मेहनत आणि गुंतवणूक या नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेली असून आता कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन एस. कार्तीकेयन यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नुकसान भरपाई प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची खात्रीही त्यांनी दिली.
दरम्यान, प्रशासनाने पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला असून पुढील काही दिवसांत अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
