पंढरपूर : पंढरपूर–सातारा महामार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महामार्गालगतच्या अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये तात्काळ व प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिले.
पंढरपूर–सातारा महामार्गावरील तांदुळवाडी (ता. माळशिरस) परिसरात भीषण अपघात घडला होता. टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी तातडीने तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील अपघातस्थळाचा आणि महामार्गालगतच्या धोकादायक भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी विजय पांगारकर तहसीलदार सुरेश शेजूळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता पी.एस. राऊत तसेच संबंधित अधिकारी, ग्रामस्थ व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकेयन एस परिसरातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तांदुळवाडी हद्दीत महामार्गालगत तीन उघड्या आणि धोकादायक विहिरी असल्याचे निदर्शनास आले. या विहिरींमुळे भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याचा धोका असल्याने तातडीने संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरू करण्याचे आदेश त्यांनी MSRDC अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी स्पष्ट केले की, केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून प्रश्न सुटणार नाही. अपघात प्रवण क्षेत्रांवर कायमस्वरूपी व शास्त्रशुद्ध सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबतही गंभीर शंका उपस्थित झाल्याने संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
या चौकशी समितीमार्फत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे का, भूसंपादन प्रक्रियेप्रमाणे काम पूर्ण झाले आहे का, पुलांचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी मानकांनुसार आहे का, तसेच गतिरोधक, लोखंडी बॅरिकेट्स, रिफ्लेक्टर, संरक्षण कठडे आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या सुरक्षितता उपाययोजना योग्य प्रकारे अंमलात आणल्या आहेत का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तांदुळवाडी परिसरात वारंवार अपघात घडत असून रस्त्याचे काम भूसंपादनानुसार पूर्ण झालेले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच येथील उघड्या पुलांवर सतत खड्डे पडत असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराकडून केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते, मात्र दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या पुलांचे आणि संपूर्ण रस्त्याचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी तांदुळवाडी हद्दीतील धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. विशेषतः विहिरींना मजबूत संरक्षण भिंती, रस्त्याच्या कडेला बॅरिकेडिंग, चेतावणी फलक, तसेच रात्रीच्या वेळी दिसण्यासाठी रिफ्लेक्टर लावण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय अपघात टाळण्यासाठी वेग नियंत्रण उपाय, योग्य ठिकाणी गतिरोधक, आणि अपघातप्रवण वळणांवर विशेष सुरक्षा व्यवस्था उभारण्यावरही भर देण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक निधी व तांत्रिक मंजुरी तातडीने देण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणानंतर प्रशासनाने महामार्ग सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलण्याची भूमिका घेतली आहे. अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या उपाययोजना प्रत्यक्षात किती लवकर व प्रभावीपणे राबवल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तांदुळवाडी येथील भीषण अपघाताने महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने आता केवळ घोषणांपुरते न थांबता ठोस कृती करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
