पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्यामध्ये आदिशक्ती संत मुक्ताई पालखीने सुमारे ७०० किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करत आगमन केले. पालखीचे गावात आगमन होताच वारकरी, ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
पालखीचे आगमन हा ग्रामस्थांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला. गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत केले. वारकरी संप्रदायातील महिलांनी फुगड्या, अभंग आणि भजनांच्या माध्यमातून भक्तिभाव व्यक्त केला. अनेकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नोडल अधिकारी तथा जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल क्षीरसागर, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. बावकर, पोलीस निरीक्षक श्री. जाधव, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, आष्टी गावचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखीतील मानकरी, दिंडीप्रमुख आणि वारकऱ्यांना हार-तुरे अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
वारकरी संप्रदायाच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने पालखी मुक्कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय तपासणी व आरोग्य सेवा, स्वच्छतागृहे, निवाऱ्याची सुविधा, प्रकाशयोजना तसेच सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली होती. विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून प्रत्येक व्यवस्थेवर लक्ष ठेवत होते.
पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रणासह पालखी मार्गावर सुरक्षा व्यवस्था मजबूत केली होती. ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे पालखीचे आगमन आणि मुक्काम सुरळीतपणे पार पडला.
आदिशक्ती संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील महाराज यांनी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, संपूर्ण पालखी प्रवासात प्रशासनाने प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी सातत्याने उपस्थित राहून आवश्यक त्या सर्व व्यवस्था करत आहेत. प्रशासनाच्या या सेवाभावी भूमिकेमुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अनेक वारकऱ्यांनीही प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसह मुक्कामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांमुळे प्रवासातील थकवा दूर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पालखीसोबत चालणाऱ्या दिंड्यांमध्ये शिस्त, भक्ती आणि सेवाभावाचे दर्शन घडत असल्याचे चित्र आष्टी येथे पाहायला मिळाले.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. संत मुक्ताई यांच्या पालखीला हजारो वारकरी श्रद्धेने साथ देत दिशेने मार्गक्रमण करत आहेत. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी विठ्ठलनाम असा भक्तिमय माहोल संपूर्ण पालखी मार्गावर अनुभवायला मिळत आहे.
वारकऱ्यांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी हरिपाठ, भजन, कीर्तन आणि सामूहिक नामस्मरणाचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. मुक्कामानंतर आदिशक्ती संत मुक्ताई पालखी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.
आषाढी एकादशीपूर्वी विविध संतांच्या पालख्यांचे आगमन होत असल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वाटचाल करत असून प्रशासनाकडून सर्व पालख्यांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे. आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचे आष्टी येथे झालेले स्वागत आणि प्रशासनाने केलेली सुयोग्य व्यवस्था ही वारी परंपरेतील सेवा, समन्वय आणि श्रद्धेचे सुंदर उदाहरण ठरत आहे.
