वाढत्या लोकसंख्येसोबतच भाड्याने राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि विविध कारणांसाठी राज्यासह देशभरातून हजारो नागरिक दाखल होत असून, ते फ्लॅट, हॉस्टेल, पेईंग गेस्ट शेअर्ड अपार्टमेंट किंवा भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्यास असतात. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांनी भाडेकरू पडताळणी आणि भाडे करार नोंदणीसंदर्भात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या ४१ घरमालक आणि भाडेकरूंवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या विशेष शाखेने ही विशेष तपासणी मोहीम राबवली असून, शहरातील प्रत्येक भाडेकरूची माहिती पोलिसांकडे उपलब्ध राहावी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना शहरात आश्रय मिळू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पडताळणी आवश्यक
पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, काही आरोपी भाड्याच्या घरात राहत असताना त्यांनी कोणतीही पोलिस पडताळणी केलेली नव्हती. अनेक प्रकरणांमध्ये घरमालकांनीही भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला दिलेली नव्हती. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
याच कारणामुळे पोलिसांनी सर्व घरमालक, इस्टेट एजंट आणि भाडेकरूंना कायद्यानुसार आवश्यक माहिती पोलिसांकडे जमा करणे बंधनकारक असल्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.
नागरिक पोर्टलवर ऑनलाइन माहिती देणे बंधनकारक
पोलिसांनी सांगितले की, राज्य शासनाच्या पोर्टलवर वर उपलब्ध असलेल्या सुविधेद्वारे घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती ऑनलाइन नोंदवणे आवश्यक आहे.
यामध्ये भाडेकरूचे नाव, कायमचा पत्ता, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, व्यवसाय, कराराची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश असतो. ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे कोणत्याही संशयास्पद हालचालींवर पोलिसांना त्वरित लक्ष ठेवणे शक्य होते.
अंतर्गत पडताळणी बंधनकारक
पोलिसांनी स्पष्ट केले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(3) नुसार प्रत्येक घरमालक, इस्टेट एजंट आणि भाडेकरू यांनी पोलिस पडताळणी करून स्थानिक पोलिस ठाण्याला भाडे कराराची माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे.
या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. विशेष शाखेचे उपायुक्त दर ६० दिवसांनी या संदर्भातील आदेश जारी करतात.
आयुक्तांच्या आदेशानुसार विशेष मोहीम
पोलिस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.
विशेष शाखेच्या झोन अधिकारी तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीदरम्यान भाडेकरू वैध करारानुसार राहत आहेत का, त्यांची पोलिस पडताळणी झाली आहे का आणि आवश्यक माहिती पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे का, याची खातरजमा करण्यात आली.
विशेष मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणारे ४१ घरमालक आणि भाडेकरू आढळून आले. त्यांच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, ही कारवाई केवळ दंडात्मक नसून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीही ही मोहीम सुरू आहे. भविष्यात अशा तपासण्या अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
इस्टेट एजंटांनाही जबाबदारी
पोलिसांनी विशेषतः इस्टेट एजंट आणि प्रॉपर्टी सल्लागारांनाही सूचना दिल्या आहेत. कोणतेही घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची ओळख, आवश्यक कागदपत्रे आणि पोलिस पडताळणी पूर्ण झाल्याची खात्री करूनच व्यवहार करावा. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एजंटांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी सर्व घरमालक, भाडेकरू आणि इस्टेट एजंट यांना तातडीने भाडेकरू पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. भाडे कराराची नोंदणी आणि पोलिस पडताळणी ही केवळ कायदेशीर औपचारिकता नसून शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
नियमांचे पालन केल्यास भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळता येतील, तसेच शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिसांना मोठी मदत होईल. त्यामुळे प्रत्येक घरमालकाने आणि भाडेकरूने आवश्यक माहिती वेळेत पोलिसांकडे सादर करून सुरक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
