मुंबई : आषाढी वारी २०२६ दरम्यान लाखो वारकरी भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदा व्यापक, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष आरोग्य मोहिमेमुळे तब्बल ७ लाख ४२ हजार ७३१ वारकरी भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली. ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर उपचार मिळून अनेक गंभीर प्रसंग टळल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची परंपरा मानली जाते. राज्याच्या विविध भागांतून लाखो वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. या प्रवासादरम्यान वाढणारा शारीरिक ताण, हवामानातील बदल, गर्दी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदा अत्याधुनिक नियोजनासह आरोग्य सेवा उभारली होती. पालखी मार्गापासून ते पंढरपूरपर्यंत विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
वारीच्या संपूर्ण कालावधीत ७ लाख ४२ हजार ७३१ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी प्रकृती गंभीर असलेल्या ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण म्हणून दाखल करून उपचार करण्यात आले, तर १ हजार ६०० रुग्णांना पुढील विशेष उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. या प्रभावी आरोग्य व्यवस्थेमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आणि गंभीर आरोग्य समस्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले.
वारीदरम्यान संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. उपलब्ध आकडेवारीनुसार ४० हजार ९३३ तापाचे रुग्ण, ११ हजार ४८६ उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ९ हजार ९७३ मधुमेहाचे रुग्ण, २३ हजार १०२ तीव्र श्वसन संसर्गाचे रुग्ण, १९ हजार ४७७ अतिसाराचे रुग्ण आणि ५ हजार ४५५ आमांश बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच २१४ रस्ते अपघातग्रस्त, ५१ हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण, ३६५ श्वानदंशाची प्रकरणे आणि १ सर्पदंशाची घटना यामध्ये तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. याशिवाय ३ क्षयरोगाचे रुग्ण निदर्शनास आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. इतर ६ लाख २९ हजार ६२९ रुग्णांनाही विविध प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ मिळाला.
वारकरी भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेली वैद्यकीय यंत्रणा ही यंदाच्या वारीचे विशेष वैशिष्ट्य ठरली. पालखी मार्गावर आणि पंढरपूर परिसरात ३५३ रुग्णवाहिका, ६९ सुसज्ज आयसीयू युनिट्स, १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत होते. या सर्वांनी दिवस-रात्र सेवा देत वारकऱ्यांना आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
यंदाच्या वारीत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. प्रथमच एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून गंभीर रुग्णांना अत्यंत कमी वेळेत उच्चस्तरीय उपचार केंद्रांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच ‘आरोग्यसंपन्न वारी’ या डिजिटल वेब ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा, उपचार केंद्रांची माहिती, आपत्कालीन संपर्क आणि विविध सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या. या डिजिटल उपक्रमाला वारकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पंढरपूर येथे २४ तास कार्यरत आयसीयू सुविधा, महाआरोग्य शिबिरे, मोफत चष्मा वाटप, तसेच विविध तपासण्या आणि उपचारांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, सामान्य वैद्यकीय तपासणी आणि औषध वितरण यांसारख्या सेवा पूर्णपणे मोफत पुरविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वारकऱ्यांच्या जुन्या आजारांचे निदानही प्रथमच झाले.
संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या. पालखी मार्गावरील आणि पंढरपूर परिसरातील पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी फवारणी, स्वच्छतेची विशेष मोहीम, तसेच आरोग्य जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबविण्यात आले. भाविकांना स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, उष्माघातापासून बचाव, संसर्गजन्य आजारांची लक्षणे आणि प्राथमिक उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य विभागाने यंदा डिजिटल मॅपिंग तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर केला. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सेवा यांचे डिजिटल समन्वयन करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत तातडीने वैद्यकीय मदत पोहोचविणे शक्य झाले. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक सेवाभाव यांचा उत्कृष्ट संगम यंदाच्या वारीत पाहायला मिळाला.
राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, जनजागृती, डिजिटल सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समन्वय साधत वारीसाठी आदर्श आरोग्य व्यवस्थापन उभे केले. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेले हे नियोजन भविष्यातील मोठ्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुयोजित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आधुनिक आरोग्य सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेवाभावी दृष्टिकोन यांच्या बळावर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे प्रभावी संरक्षण करण्यात राज्य शासनाला यश आल्याचे स्पष्ट होत आहे.
