मुंबई, दि. ९ मे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डच्या विक्रीत अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. कार्डची जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात सुमारे ३ हजारांहून अधिक अधिकृत विक्रेत्यांमार्फत NCMC कार्डचे वितरण सुरू असून, सवलतधारक प्रवाशांना पारदर्शक व सुलभ सेवा मिळावी यासाठी एसटी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. काही ठिकाणी कार्डसाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर परिवहन विभागाने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेले हे स्मार्ट कार्ड ठरावीक शुल्कातच उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, अतिरिक्त पैसे आकारणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील. यासाठी जिल्हानिहाय तपासणी मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांनी कोणत्याही प्रकारची जादा आकारणी झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक किंवा एसटीच्या अधिकृत हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही महामंडळाकडून करण्यात आले आहे.
