सांगोला प्रतिनिधी: वाणीचिंचाळे येथील रहिवासी अजित शिंदे यांच्या दोन वर्षांच्या मुलीला, प्रगती अजित शिंदे हिला डाव्या हाताला दुखापत झाल्यानंतर सांगोला शहरातील सद्गुरु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पालकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टरांनी मुलीवर शस्त्रक्रिया केली. मात्र शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या हाताची हालचाल पूर्वीसारखी होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सांगोला शहरातील सद्गुरु हॉस्पिटल डॉक्टर धनंजय गावडे याच्या अनेक तक्रारी इन पब्लिक न्यूज ने प्रसिद्ध केल्या होत्या यानंतर सुधारणा करतील अशी आश्वासने देण्यात आली होती परंतु डॉक्टर धनंजय गावडे यांच्या पैशाच्या हव्यासापोटी त्याला भस्मासुर झाला आहे की काय म्हणून लोकांचे जीव घेण्यास सतत तयारीत असतात शहरातील इमर्जन्सी ॲम्बुलन्स यांना मॅनेज करून स्वतःच्याच दवाखान्याकडे पेशंट घेऊन जाण्यासाठी तडफड सुरू असणारा डॉक्टर धनंजय गावडे यांनी एका दोन वर्षे लहान मुलीचा चुकीचे ऑपरेशन करून चक्क हात निकामी केला आहे या निर्दयी आणि जीवघेणा डॉक्टरला तात्काळ दवाखाना बंद करण्याची मागणी शहरातून केली जात आहे.
मुलीची प्रकृती आणि हाताची स्थिती पाहून पालकांनी इतर वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्याचे सांगितले जात आहे. या तपासणीत हातातील नसांशी संबंधित गंभीर समस्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे मुलीच्या उपचारादरम्यान नेमकी काय चूक झाली, शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने झाली का आणि त्यानंतर निर्माण झालेल्या समस्येचे वैद्यकीय कारण काय आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
या घटनेमुळे मुलीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, आपल्या मुलीच्या भवितव्याबाबत त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांकडे तक्रार करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
पालकांनी सांगोला तहसील कार्यालयाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष वैद्यकीय चौकशी करण्यात यावी, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्यात यावी, तसेच चौकशीत वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय मुलीला पुढील आवश्यक उपचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरच्या वैद्यकीय परवान्याबाबत तसेच रुग्णालयाच्या परवानगीबाबत कायदेशीर तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे सांगोला शहरात रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि वैद्यकीय सेवांच्या गुणवत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे. एखाद्या रुग्णावर उपचार किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्यास त्यामागील नेमके कारण वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
दरम्यान, पालकांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली असून, मुलीला योग्य उपचार मिळावेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, यासाठी ते ठाम आहेत. आता प्रशासन या तक्रारीची कशा पद्धतीने चौकशी करते आणि त्यातून काय निष्कर्ष समोर येतात, याकडे सांगोला शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
