पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे लाखो वारकरी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने यंदा अभूतपूर्व नियोजन केले आहे. राज्यभरातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वेळेवर व्हावा यासाठी तब्बल ५ हजार ५०० विशेष एसटी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकात झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली.
आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नगराध्यक्षा प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यात्रेच्या काळात बससेवा आणि प्रवासी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. पंढरपूरातील विविध बसस्थानकांवर थांबणाऱ्या सर्व बसेसची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्यात यावी, तसेच प्रत्येक विशेष बसवर ‘आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा’ असा दर्शनी फलक लावण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
यात्रेदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या चालक आणि वाहकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बसस्थानक परिसरात चालक-वाहकांसाठी वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
एकादशीच्या दिवशी आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करण्यात येणार आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने भाविकांना बसेसमध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भाविकांशी सौजन्याने आणि संयमाने वागावे, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
यंदाच्या यात्रेत आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारच्या विविध योजनांचा लाभही यात्रेदरम्यान कायम ठेवण्यात आला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असून, ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बससेवेची आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले.
मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने ५ हजार १४५ विशेष बसेस चालवून सुमारे २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा यात्रेतील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यापेक्षा अधिक सूक्ष्म आणि व्यापक नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार असून, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्षही कार्यरत राहणार आहेत.
वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर आणि परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग आयटीआय महाविद्यालय अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, स्वच्छता व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे लाखो भाविकांना अधिक सुसज्ज आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
यात्रेदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये दिवसेंदिवस वारकरी आणि भाविकांची संख्या वाढत आहे. दरवर्षी सुमारे १८ ते २० लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. त्यातील मोठा वर्ग एसटी महामंडळाच्या सेवेला प्राधान्य देत असल्याने यंदाच्या बस व्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुविधायुक्त करण्यासाठी एसटी महामंडळाने केलेले हे व्यापक नियोजन यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
