पंढरपूर: लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा महासागर मानली जाणारी आषाढी वारी यंदा अधिक सुरक्षित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आणि बहुआयामी आपत्कालीन यंत्रणा उभारली आहे. चंद्रभागा नदी, घाट परिसर, पालखी मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध विभागांचा समन्वय साधत आधुनिक बचाव साहित्य, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या आषाढी वारीत प्रथमच जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक कार्यरत राहणार असून, ही या वर्षीच्या व्यवस्थेची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरत आहे.
दरवर्षी लाखो भाविक चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी उतरतात. नदीपात्रातील गर्दी, पाण्याचा प्रवाह आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक बचाव पथके आणि पोलीस यांच्यात प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे.
आषाढी वारीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी सहा अग्निशमन वाहने आणि एक अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. या रेस्क्यू व्हॅनची जबाबदारी पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नदी परिसरातील बचाव मोहिमा अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली सर्व आधुनिक साधने या वाहनामध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
भाविकांना नदी पार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रवासी होड्यांच्या सुरक्षिततेलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी एकूण १,०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले असून, या संपूर्ण व्यवस्थेचे समन्वयक म्हणून जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. जेडे कार्यरत आहेत. प्रत्येक होडीत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून, लाईफ जॅकेटचा वापर अनिवार्य करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
चंद्रभागा नदीत कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य सुरू करता यावे यासाठी एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
या बोटींसाठी शंभर लाईफ जॅकेट, तीस लाईफ रिंग, नऊ वॉकी-टॉकी संच, पाच मेगाफोन, चार इन्फ्लेटेबल टेंट, सहा मिमी स्टॅटिक रेस्क्यू रोप, पाच उच्च क्षमतेचे टॉर्च, दोन लेझर पॉइंटर आणि दोन लाईट बॅटन अशी आधुनिक बचाव सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण बचाव यंत्रणेचे नियंत्रण आणि समन्वय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहे.
नदीपात्र आणि घाट परिसरात सातत्याने गस्त घालण्यासाठी व बचाव कार्यासाठी तब्बल १८० प्रशिक्षित आपदा मित्र तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एनडीआरएफचे ३० जवान, ठाणे येथील आपदा मित्रचे २ सदस्य, वाशीम जिल्ह्यातील १०, पिंपरी-चिंचवड आपत्ती संघाचे १०, वन्यजीव रेस्क्यू पुणेचे १०, मुळशी आपत्ती समितीचे १०, हेल्पिंग हँड शिरोळ (कोल्हापूर)चे २०, सारथी फाउंडेशन सोलापूरचे १०, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरीचे १०, पंढरपूर शहरातील आदिवासी रेस्क्यू कोळी समाजाचे ३० होडीवाले, महाराष्ट्र रेस्क्यू फाउंडेशन पंढरपूरचे ५, सोलापूर जिल्ह्यातील २० पोलिस पाटील तसेच रेड फेरी ग्रुप सोलापूरच्या महिला बचाव पथकातील १५ सदस्यांचा समावेश आहे.
ही सर्व पथके नदीपात्र, घाट, होडी मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त घालून कोणत्याही दुर्घटनेला तात्काळ प्रतिसाद देणार आहेत. याशिवाय बचाव बोटींच्या देखभालीसाठी दोन अनुभवी मेकॅनिकही संपूर्ण वारी कालावधीत पंढरपूरमध्ये तैनात ठेवण्यात आले आहेत.
यंदाच्या आषाढी वारीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक प्रथमच अधिकृतपणे बचाव कार्यात सहभागी होणार आहे. रेड फेरी ग्रुप सोलापूरच्या या प्रशिक्षित महिला सदस्यांनी यापूर्वी अनेक आपत्कालीन परिस्थितींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात सुमारे ३०० नागरिकांच्या सुटका मोहिमेत या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याचबरोबर कार्तिकी वारी, चैत्र वारी आणि माघ वारीदरम्यानही या महिला पथकाने यशस्वी बचाव कार्य करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत महिलांच्या सहभागामुळे बचाव यंत्रणेची ताकद आणखी वाढणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
चंद्रभागा नदी परिसरात एखादा भाविक आजारी पडल्यास किंवा दुर्घटना घडल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी बोट ॲम्ब्युलन्सचीही तयारी करण्यात आली आहे. रेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध होताच ही विशेष बोट ॲम्ब्युलन्स कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.
या बोटीद्वारे नदीपात्रातून रुग्णांना तातडीने किनाऱ्यावर आणून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नदीतील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला अधिक वेगाने प्रतिसाद देता येणार आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी चंद्रभागा नदीत स्नानासाठी येतात. त्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन, नदीतील सुरक्षा, होडी वाहतूक, बचाव कार्य आणि वैद्यकीय सुविधा या सर्व बाबींवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. चंद्रभागा नदीपात्र, घाट परिसर आणि पालखी मार्गावर २४ तास दक्षता ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सतत कार्यरत राहणार आहे.
सुरक्षित, शिस्तबद्ध आणि निर्विघ्न आषाढी वारी पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत व्यापक तयारी पूर्ण केली असून, यंदाची आपत्कालीन व्यवस्था मागील वर्षांच्या तुलनेत अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूपाची असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्रद्धा आणि सुरक्षितता यांचा समतोल राखत लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
