पुणे : शहराला ‘स्मार्ट सिटी’चा दर्जा मिळाल्याचा दावा केला जात असला तरी अनेक भागांमध्ये नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखल आणि साचलेल्या पाण्याने भरून जात असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
अगदी हलका पाऊस झाला तरी शाळेकडे जाणारा रस्ता साचलेल्या पाण्याने आणि चिखलाने पूर्णपणे झाकला जातो. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी चिखलातून चालत जावे लागते. अनेक ठिकाणी पाण्याखाली खड्डे असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे दैनंदिन हाल पाहून स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या गणवेशावर चिखल उडणे, पाय घसरून पडण्याच्या घटना तसेच वाहतुकीची कोंडी यामुळे परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही पालकांनी तर पावसाच्या दिवसांत मुलांना शाळेत पाठवताना सतत चिंता वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
महानगरपालिकेवर टीका करत विचारले की, शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या विकासकामांचा गाजावाजा केला जात असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ताही उपलब्ध करून देता येत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“दररोज विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही.महानगरपालिकेने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थी, पालक आणि शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा,” अशी ठाम मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याची समस्या नवीन नाही. अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की हीच परिस्थिती निर्माण होते आणि विद्यार्थ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो.
नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील खड्डे मुजवणे योग्य जलनिस्सारण व्यवस्था उभारणे आणि पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच शाळांच्या परिसरातील रस्त्यांना प्राधान्य देऊन विशेष दुरुस्ती मोहीम राबवावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील शैक्षणिक संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिकेने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
पावसाळ्यात शाळकरी मुलांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची हमी देणे ही स्थानिक प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली असून, प्रशासन यावर किती जलद आणि प्रभावी कारवाई करते, याकडे पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
