सांगोला/प्रवीण शिवपूजे : सांगोला शहरात सायंकाळी आठच्या सुमारास महूद रोड बायपास परिसर गर्दी असलेल्या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि आठ जणांची टोळी यांनी महुद रोड बायपास परिसरातील जिजाऊ पार्क येथे व्यावसायिकाला पांढऱ्या रंगाच्या पाइपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, पिस्तुलासारख्या हत्याराचा धाक दाखवत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मंगळवेढा परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी केल्या दोन दिवसापासून आंधळगाव मंगळवेढा या भागात भर दिवसा सकाळी अकराच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरीची घटना घडली आहे. तसेच शेतकऱ्यांची सर्व चौकशी करत माहिती घेत सायंकाळी अकराच्या दरम्यान गावातील तीन दुकाने फोडून कपडे किराणामाल लुटला दरम्यान साडेअकराच्या दरम्यान गावातील एका इसमाने यांची चौकशी केली असता त्याला खोटे बोलत तिथून पसार झाले यानंतर रात्री दोनच्या दरम्यान पुन्हा गावात घुसून दुकाने फोडली दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता शेळ्या चोरून नेल्या यानंतर गावच्या परिसरात मंगळवेढा सांगोला नॅशनल हायवेवर एक कर्नाटकची गाडी लुटून सांगोला येथे वासुद रोड परिसरात हे चोर पळून आले. दरम्यान वासुद रोड परिसरात काही लोकांनी त्यांना अडवले असता त्यांच्याच डोक्याला पुन्हा पिस्तूल लावत त्यांना दमदाटी करत जोरदार भांडण केले या भांड्यामध्ये एका चोरास जबर मारहाण झाली त्याचा पाय तोडण्यात आला यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे करत असून संपूर्ण प्रकरणाचा लवकरच छडा लावणार असल्याचे त्यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगितले.
व्यवसायीकाने दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर पांडुरंग गवळी व त्याचे इतर सहा साथीदार यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास महुद रोड बायपास येथील जिजाऊ पार्क परिसरात ही घटना घडली. फिर्यादी यांना आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या पाइपने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पिस्तुलासारख्या हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
लुटण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४० हजार रुपये रोख, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन आणि अंदाजे ७० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत २ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
घटनेनंतर आरोपी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून मंगळवेढा-सोलापूर रोडच्या दिशेने फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात सध्या कोणताही मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलेला नसून, मिळालेला मुद्देमाल निरंक असल्याची नोंद आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस नाईक जाधव यांनी केली आहे.
या घटनेमुळे महुद रोड बायपास परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान सांगोला पोलिसांसमोर आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमके कारण आणि सर्व आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.
