विशेष प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाजावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत असून, आता संस्थेच्या अध्यक्षांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून स्पष्ट भूमिका मांडवी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाविद्यालयातील कथित गैरप्रकार, प्रशासनावरील आरोप आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेमध्ये प्रभारी प्राचार्य शंकर धसाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनागोंदी कारभार, स्वतःच्या मनाचेच नियम, विद्यार्थ्यांची हेळसांड, वैयक्तिक द्वेषातून प्राध्यापकांना विनाकारण टारगेट, अशा गोष्टींना तोंड फुटल्याचे उघड होत आहे. यावर ज्यांनी प्रश्न केला त्यांनाच खोट्या नाट्यात गोष्टी उभ्या करून दबाव टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्व.आबासाहेबांच्या संस्थेत चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी करणाऱ्याला चपराक बसवणे गरजेच असून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संस्थेचे अध्यक्ष नेमकं करतात काय या अध्यक्षांना आता जागे होण्याची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले.
स्व. डॉ. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांनी उभारलेल्या संस्थेची ओळख शैक्षणिक गुणवत्ता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी अशी राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना धक्का पोहोचेल, असे कोणतेही प्रकार होऊ नयेत, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या अध्यक्षांनी या घडामोडींकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, झोपलेल्या अध्यक्षांना नेमकी जाग कधी येणार? स्व. आबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत असताना कुठेही धक्का लागू नये याची अध्यक्ष काळजी घेणार का ? बोगस, खोट्या तक्रारींना अध्यक्ष पाठीशी घालणं थांबवणार का? अध्यक्ष या वटवृक्षाकडे लक्ष देणार का ? उच्चशिक्षित असून देखील आडमुठेपणा वागणाऱ्या लोकांना अध्यक्ष चपराक बसवणार का? असे नानाविध सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहेत.
दरम्यान, अध्यक्ष या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेणार, प्रशासनावरील आरोपांची ते चौकशी करणार का? आरोपांची दखल घेतली जाणार का आणि महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता सुरळीत करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
इन पब्लिक न्यूज या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असून, संस्थेचे अध्यक्ष याची अधिकृत भूमिका प्राप्त होताच तीही वाचकांसमोर प्रसिद्ध करण्यात येईल. अध्यक्षांना संपर्क केला असता संपर्क होत नसल्याचे प्रतिनिधीकडून माहिती देण्यात आली.
