सांगोला, प्रतिनिधी : लोणारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक विकासाला गती मिळावी तसेच शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ समाजातील युवक, महिला आणि उद्योजकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री नामदार अतुल सावे यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान लोणारी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.
राज्यात विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक विकास महामंडळे कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर लोणारी समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेले विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ हे समाजातील युवक, महिला, लघुउद्योजक आणि स्वयंरोजगार इच्छुकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ मिळण्यात विविध अडचणी येत असल्याचे आमदार देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या महामंडळाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये लोणारी समाजाचे नाव आणि जात क्रमांक १८३ यांचा समावेश नसल्यामुळे अनेक अर्जदारांना अर्ज सादर करताना तांत्रिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी पात्र असूनही अनेक लाभार्थी कर्ज योजनांपासून वंचित राहत आहेत. ही गंभीर बाब असून संबंधित ऑनलाइन प्रणालीमध्ये तातडीने आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.
याशिवाय, महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनांमध्ये असलेल्या जाचक अटी देखील लाभार्थ्यांसाठी अडसर ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अल्प रकमेच्या कर्जासाठी दोन जामीनदारांची सक्ती, तसेच शासकीय सेवक आणि किमान आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या व्यक्तीचा जामीनदार म्हणून समावेश करण्याची अट अनेक ग्रामीण युवक आणि महिलांसाठी अडचणीची ठरत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना अशा जामीनदारांची उपलब्धता नसल्यामुळे अनेकांना कर्ज मिळणे कठीण होत आहे.
आमदार देशमुख यांनी निवेदनाद्वारे कर्ज योजनांमधील विद्यमान कर्ज मर्यादा वाढविण्याचीही मागणी केली आहे. वाढती महागाई, उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी लक्षात घेता सध्याची कर्ज मर्यादा अपुरी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युवकांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी कर्ज मर्यादा वाढविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ग्रामीण भागातील उद्योजक, महिला बचत गट, लघुउद्योग व्यावसायिक आणि नवउद्योजक यांना सुलभ निकषांवर कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला तरच त्या योजनांचा उद्देश सफल होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोणारी समाजातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे, महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे आणि लघुउद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक कर्ज सहजपणे मिळावे, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री नामदार अतुल सावे यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले असून, समाजाच्या हिताच्या या मागण्यांबाबत मंत्री महोदय सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले की, लोणारी समाजाच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी आमदार देशमुख सातत्याने पाठपुरावा करत असून शासन स्तरावर या मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागण्या मान्य झाल्यास राज्यातील हजारो लोणारी बांधवांना त्याचा थेट लाभ मिळणार असून त्यांच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल.
