रोहित हेगडे :– सांगोला शहरातील नगरपालिका निवडणूक संपल्यानंतर नगरपरिषदेच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात असून, अनेक कथित गैरप्रकार व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे तालुकाप्रमुख विशाल केदार आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे-पाटील यांनी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्याकडे विविध विषयांबाबत माहिती व निवेदनाद्वारे मागण्या केल्या होत्या. मात्र, संबंधितांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याचा आरोप करत दोघांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील विविध विकासकामे, बांधकामे, रस्ते, भुयारी गटार योजना, दिवाबत्ती व्यवस्था, अनधिकृत बांधकामे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी माहिती मागितली आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागणी करूनही अपेक्षित माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिवाबत्तीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
शहरातील दिवाबत्ती व्यवस्थेबाबत उपोषणकर्त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्याकडे दिवाबत्ती संदर्भातील पत्र उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. एका पोस्टसाठी सुमारे ७ हजार रुपये, तर एलईडी दिव्यासाठी सुमारे १८ हजार रुपयांपर्यंत खर्च कशासाठी करण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या खर्चाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित समितीमार्फत तपासणी करावी, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
हातगाडीधारकांच्या प्रश्नावरही आवाज
शहरातील हातगाडीधारकांवर झालेल्या अन्यायाचा मुद्दाही उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. हातगाडीधारकांशी संबंधित कारवाई, परवानगी आणि प्रशासनाच्या निर्णयांची माहिती माहितीच्या अधिकारातून मागविण्यात आली होती. मात्र, अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून हातगाडीधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्रिमूर्ती टॉकीज परिसरातील बांधकामांची चौकशी
सांगोला शहरातील त्रिमूर्ती टॉकीजजवळ सुरू असलेल्या दोन बांधकामांबाबतही उपोषणकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या बांधकामांना परवानग्या कोणत्या नियमांनुसार देण्यात आल्या, संबंधित कागदपत्रांची तपासणी झाली आहे का आणि बांधकाम नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह संबंधित विभागांच्या कामकाजाचीही तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एन.ए. प्लॉटची माहिती देण्याची मागणी
मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत शहरात झालेल्या एन.ए. प्लॉटची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्लॉटसाठी आवश्यक परवानग्या, प्रक्रिया आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे का, याबाबतची माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करा
सांगोला शहरात झालेल्या विविध रस्त्यांच्या कामांबाबतही उपोषणकर्त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. रस्त्यांसाठी मंजूर निधी, प्रत्यक्ष करण्यात आलेले काम, वापरण्यात आलेली सामग्री आणि कामाची गुणवत्ता यांची तांत्रिक तपासणी करावी. तसेच प्रत्येक कामाचा प्रमाण व गुणवत्तेचा अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी
सन २०२२ ते २०२६ या कालावधीत शहरात झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. योजनेसाठी झालेला खर्च, कामाची प्रत्यक्ष स्थिती, वापरण्यात आलेली सामग्री आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
अनधिकृत बांधकामे आणि परवान्यांचा मुद्दा
शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही उपोषणाच्या केंद्रस्थानी आहे. काही बांधकामांना परवाने कोणत्या पद्धतीने देण्यात आले, संबंधित बांधकामांना नियमांची पूर्तता होती का आणि परवानगी देताना नगरपरिषदेने कोणती प्रक्रिया अवलंबली, याची माहिती मागविण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना सर्वांसाठी समान निकष लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न
नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीबाबतही उपोषणकर्त्यांनी आवाज उठविला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनात किंवा सेवाशर्तींमध्ये कोणताही अन्याय होत असल्यास त्याची चौकशी करावी. संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन व सुविधा मिळत आहेत का, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी संबंधित प्रश्नांबाबत माहिती व निवेदन देऊन प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा केली होती. मात्र, उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप करत त्यांनी आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासमोर विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेले सर्व आरोप हे त्यांच्या म्हणण्यानुसार असून, संबंधित कागदपत्रे, अधिकृत अहवाल आणि नगरपरिषद प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतरच या आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करावी आणि आवश्यक त्या चौकशा करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे.
या उपोषणाची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, संबंधित मागण्यांवर कोणती कार्यवाही केली जाते आणि उपोषणकर्त्यांना मागणीनुसार माहिती व स्पष्टीकरण मिळते का, याकडे आता या उपोषणावर इन पब्लिक न्यूज चे लक्ष असून या संपूर्ण कारभाराविरोधात प्रशासन काय भूमिका घेणार प्रशासनाकडून मिळालेली माहिती इन पब्लिक न्यूज वर प्रसिद्ध करण्यात येईल .
