पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात लाखो वारकऱ्यांपर्यंत राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सक्षम व्हावा तसेच जनजागृतीचा व्यापक संदेश द्यावा या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या उपक्रमाला वारकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून शासनाच्या विविध योजनांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दालनाची पाहणी करत विविध विभागांनी उभारलेल्या माहिती केंद्रांची माहिती घेतली. शासनाच्या योजनांची माहिती केवळ कागदोपत्री न राहता ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. वारीसारख्या विशाल धार्मिक सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असल्याने जनजागृतीसाठी हा सर्वोत्तम मंच असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांसाठी शासन योजनांची माहिती
आषाढी वारीत राज्यभरातून लाखो वारकरी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत सहज आणि आकर्षक पद्धतीने पोहोचविण्यासाठी ‘संवादवारी’ उपक्रम राबविण्यात आला आहे. दालनामध्ये विविध विभागांचे स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्यात आले असून प्रत्येक योजनेची माहिती पुस्तिका, माहितीफलक, डिजिटल माध्यमे आणि मार्गदर्शक अधिकारी यांच्या माध्यमातून दिली जात आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक, कामगार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना विविध कार्यालयांमध्ये न जाता योजनांची माहिती मिळत आहे.
एलईडी चित्ररथ, पथनाट्य आणि डिजिटल सादरीकरणातून जनजागृती
‘संवादवारी’ उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माहिती देण्याची आधुनिक आणि आकर्षक पद्धत. शासनाच्या विविध योजनांवर आधारित एलईडी चित्ररथ, माहितीपट, लघुपट, डिजिटल सादरीकरण, पथनाट्य आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भाविकांशी संवाद साधला जात आहे.
वारी मार्गावर फिरणाऱ्या चित्ररथांमधून योजनांचे लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली जात आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेशही दिले जात असून पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, जलसंवर्धन, महिला सक्षमीकरण आणि कृषी विकास यासारख्या विषयांवरही जनजागृती केली जात आहे.
शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष भर
या विशेष दालनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण योजना, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, कृषी विभागाचे डिजिटल उपक्रम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारख्या कृषीविषयक योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.
महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, विविध स्वयंरोजगार व सक्षमीकरण योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास व गुंतवणूक उपक्रम, रोजगार निर्मितीच्या योजना आणि करिअर मार्गदर्शनाची माहिती दिली जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, आश्रम शाळांमधील सुविधा, उच्च शिक्षण व कौशल्य विकासाशी संबंधित विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.
आरोग्य, गृहनिर्माण आणि सामाजिक सुरक्षा योजनांवरही भर
दालनात महात्मा फुले जनआरोग्य योजना, कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, महाराष्ट्र गृहनिर्माण योजना, दिव्यांग धोरण, हरित ऊर्जा उपक्रम, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन व विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांसारख्या योजनांची माहितीही भाविकांना दिली जात आहे.
प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत असून योजनांचा लाभ कसा घ्यावा, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज प्रक्रिया कशी आहे याबाबतही मार्गदर्शन करत आहेत.
शासन-जनता संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न
‘संवादवारी’ हा उपक्रम केवळ योजनांची माहिती देणारा नसून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरत आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेल्या वारीमध्ये शासनाचा विकासाचा संदेश पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचल्यास अधिकाधिक पात्र लाभार्थी योजनांचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल माध्यमे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने उभारण्यात आलेले हे विशेष दालन वारकऱ्यांसाठी माहिती, मार्गदर्शन आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरत असून, राज्य शासनाच्या विविध विकासात्मक योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने ‘संवादवारी’ हा उपक्रम प्रभावी पाऊल मानला जात आहे.
