Sangola Police
सांगोला : कडलास (गायकवाड वस्ती) परिसरातील मान नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सांगोला पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टर, डंप ट्रॉली आणि अंदाजे एक ब्रास वाळू, असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला/वड्डेगाव पोलीस पथक कडलास येथील गायकवाड वस्ती परिसरात गस्त घालत होते. यावेळी मान नदीच्या पात्रात एका ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत लाल रंगाचा महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टर व डंप ट्रॉली ताब्यात घेतली. या वाहनावर नोंदणी क्रमांक नसल्याचेही आढळून आले. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास अवैध वाळू असल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले.
मान नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, शासनाचा महसूलही बुडत असल्याचे प्रशासनाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अवैध वाळू उपशावर पोलिस आणि महसूल विभागाकडून कारवाई केली जात आहे.
दरम्यान, कडलास परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
