सांगोला प्रतिनिधी : राज्यातील बहुतांश भागात यंदाच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून कृष्णा, कोयना, पंचगंगा, नीरा, भीमा यांसारख्या प्रमुख नद्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र याच्या अगदी उलट चित्र जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात पाहायला मिळत आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या सांगोल्यात यंदाही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक गंभीर संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारकडे टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांमधून तातडीने तालुक्यातील माणगंगा आणि कोरडा नदीत पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच तालुक्यातील ओढे, नाले, तलाव आणि बंधारे भरून दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाला देणार निवेदन
सांगोला तालुक्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना लेखी निवेदन देणार आहेत. या निवेदनाद्वारे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार असून त्यानंतर प्रशासनाची भूमिका पाहून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात महापूर, सांगोल्यात दुष्काळ
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि कृष्णा खोऱ्यात यंदा विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा, नीरा आणि भीमा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिरिक्त पाणी धरणांतून सोडावे लागत आहे.
दुसरीकडे सांगोला तालुक्यात मात्र पावसाचा अत्यंत कमी प्रभाव दिसून येत आहे. पावसाळ्याचे जवळपास दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. अनेक शेतांमध्ये पेरण्या निष्फळ ठरल्या असून उभ्या पिकांवर कोमेजण्याची वेळ आली आहे. फळबागांनाही पाण्याअभावी मोठा फटका बसत आहे.
जलसंपदा मंत्र्यांची भेट
टेंभू आणि म्हैसाळ योजनांमधून तालुक्यास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी करण्यात आली होती.
यावेळी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला. मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
भूजल पातळी तळाला
तालुक्यातील पावसाअभावी भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. अनेक विहिरी, कुपनलिका आणि तलाव कोरडे पडले आहेत. गावागावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पशुपालकांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह हिरव्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेल्या पेरण्या वाया गेल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. कृषी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसण्याची भीती आहे.
पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी
दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. टेंभू उपसा सिंचन योजनेतून माणगंगा नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे भरावेत. त्याचबरोबर या पाण्याचा उपयोग करून तालुक्यातील तलावही भरावेत.
याशिवाय म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून त्या नदीवरील सर्व बंधारे आणि जलसाठे भरून काढावेत. तसेच नीरा उजवा कालवा, स्थानिक सिंचन योजना, नद्या, नाले आणि ओढ्यांमध्ये अतिरिक्त पाणी सोडल्यास दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची तयारी
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास व्यापक जनआंदोलन उभारून शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले जातील, असा इशारा त्यांनी दिला.
त्यांच्या मते, राज्यात एका बाजूला महापुरामुळे पाणी वाहून जात आहे, तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या एका थेंबासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे उपलब्ध अतिरिक्त पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळी भागांना दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
आधी निवेदन, नंतर आंदोलनाची दिशा
या संपूर्ण प्रश्नावर निवेदनानंतर शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, तालुक्याच्या पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय आणि लोकसहभागातून लढा उभारण्याची तयारी सुरू असून, शेतकरी आणि नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आवश्यक ते सर्व मार्ग अवलंबले जातील. त्यामुळे आता शासनाने विलंब न करता टेंभू आणि म्हैसाळ योजनांमधून तातडीने पाणी सोडून सांगोला तालुक्याला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
