सांगोला प्रतिनिधी: सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडी आणि विनापरवाना लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर विलास मगर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत आयशर मालवाहू वाहनासह तब्बल 9.89 घनमीटर लिंबाचे जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. या प्रकरणी वनअपराध प्रथम गुन्हा क्र. ओ-01/2026 नोंद करण्यात आला असून संबंधितांवर वनकायद्याअंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून वनविभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात नियमित गस्त घालत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांचे पथक परिसराची पाहणी करत होते. त्यावेळी एका खासगी मालकीच्या क्षेत्रात लिंबाच्या झाडाची तोड करून त्याचे लाकूड आयशर (एमएच 11 एएल 3258) या वाहनात भरले जात असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.
संशय आल्याने वनकर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र झाड तोडण्यासाठी आवश्यक असलेला वृक्षतोड परवाना तसेच लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वाहतूक पास संबंधितांकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही संपूर्ण कारवाई विनापरवाना आणि वननियमांचे उल्लंघन करून होत असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत वाहनातील संपूर्ण लाकूडसाठा आणि आयशर वाहन जप्त केले. जप्त केलेल्या मालावर वनविभागाचा अधिकृत शिक्का मारण्यात आला. पंचनामा, जप्तीची कागदपत्रे आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून वाहन व लाकूड वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर संबंधितांविरोधात वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू करण्यात आली.
या कारवाईनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर विलास मगर यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, वनविभागाची पूर्वपरवानगी आणि वैध वाहतूक पासशिवाय कोणतीही वृक्षतोड किंवा लाकूड वाहतूक करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर वनविभागाचे बारकाईने लक्ष असून भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सागर मगर पुढे म्हणाले की, तालुका दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात असल्याने येथील प्रत्येक झाड पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि वाढते तापमान यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी झाडांचे संरक्षण करावे, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी आणि आवश्यक असल्यास झाड तोडण्यापूर्वी वनविभागाची विधिवत परवानगी घ्यावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वनविभागाने नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वनक्षेत्रात किंवा खासगी मालकीच्या जागेत कुठेही अवैध वृक्षतोड, विनापरवाना लाकूड वाहतूक किंवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वेळेवर माहिती दिल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वनसंपत्तीचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जपणे आवश्यक आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करूनच वृक्षतोड आणि लाकूड वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंह तसेच सहायक वनसंरक्षक (कॅम्पा) ए. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर विलास मगर, वनपाल एस. ए. घावटे आणि वनरक्षक एस. व्ही. नरळे यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला असून अशा कारवाया भविष्यात अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
