पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे नियमित शारीरिक प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्याने प्रथम टर्मच्या कॅडेटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. १७ वर्षीय कॅडेट अभिनव बाजपेयी यांना प्रशिक्षणादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच ते बेशुद्ध पडले. तातडीने वैद्यकीय उपचारासाठी त्यांना हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविता आले नाही.
कॅडेट अभिनव बाजपेयी यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेतला होता. एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतरच्या प्रारंभीच्या प्रशिक्षण प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांचा नियमित शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होता. आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत पीटी परेडदरम्यान त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार प्रशिक्षकांकडे केली. त्यानंतर काही क्षणांतच ते अचानक बेशुद्ध पडले.
घटना लक्षात येताच प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक उपचार देत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एनडीए परिसरात शोककळा पसरली असून सहकारी कॅडेट, प्रशिक्षक आणि अधिकारी यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनव बाजपेयी हे भारतीय सशस्त्र दलात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. कठोर निवड प्रक्रियेत यश मिळवत त्यांनी नुकताच एनडीएमध्ये प्रवेश मिळवला होता. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या त्यांच्या प्रशिक्षण प्रवासाला अशा दुर्दैवी घटनेमुळे अचानक पूर्णविराम मिळाला.
एनडीएमधील प्रशिक्षण हे अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेतले जाते. प्रत्येक कॅडेटची वैद्यकीय तपासणी, शारीरिक क्षमता आणि प्रशिक्षणादरम्यानची प्रकृती यावर सातत्याने लक्ष ठेवले जाते. तरीही काही वेळा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय कारणांमुळे अशा दुर्दैवी घटना घडू शकतात. प्राथमिक माहितीनुसार, कॅडेटला प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली होती. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
एनडीए प्रशासनाने सर्व आवश्यक प्रक्रिया सुरू केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला जात आहे. कॅडेटच्या कुटुंबीयांना तातडीने घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. आवश्यक शासकीय आणि लष्करी औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशातील सर्वात प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळविणे हे हजारो तरुणांचे स्वप्न असते. कठोर लेखी परीक्षा, सेवा निवड मंडळाची मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना येथे प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कॅडेटना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि लष्करी शिस्त यांचे व्यापक प्रशिक्षण दिले जाते.
अभिनव बाजपेयी यांच्या निधनामुळे एनडीएतील अधिकारी, प्रशिक्षक आणि सहकारी कॅडेट यांच्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाबद्दल संवेदना व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे संपूर्ण संरक्षण प्रशिक्षण समुदाय शोकमग्न झाला आहे.
दरम्यान, वैद्यकीय तपासणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानुसार पुढील अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा अंदाज व्यक्त न करण्याचे आवाहन संबंधित सूत्रांकडून करण्यात आले आहे.
