सांगोला : शेतातील विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना विलास भोसले (वय ५१, रा. खवासपूर, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या शेतात ही घटना घडली. विहिरीचे पाणी वापरण्यावरून झालेल्या वादातून आरोपी शामराव सोपान भोसले यांनी लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे.
या वेळी बाळु सोपान भोसले यांनीही फिर्यादीस धमकी देत मारहाण करण्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दोघांनी शिवीगाळ करत “पुन्हा विहिरीवर आली तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे.
घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा अहवाल JMFC कोर्ट सांगोला येथे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतातील पाण्यावरून वाढणारे वाद चिंतेचा विषय ठरत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
