पंढरपूर : आषाढी वारी च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक नियोजन केले असून, “वारकरी समाधानी होईल अशी सेवा देणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सामाजिक ऐक्याचा महत्त्वाचा सोहळा आहे. त्यामुळे ही वारी “सुरक्षित, स्वच्छ आणि निर्मळ” करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून उत्कृष्ट प्रशासनाचे उदाहरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजेंद्र खरे, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल मंदिर परिसर, दर्शन रांग, भक्ती सागर, चंद्रभागा नदीपात्र तसेच वाळवंट परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी स्वच्छतेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले असले, तरी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. दर्शन रांग, चंद्रभागा नदी परिसर आणि वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सातत्याने स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी. वारीसाठी लाखो भाविक दूरदूरवरून येतात. त्यांनी पंढरपूरमधून समाधान आणि चांगला अनुभव घेऊन परतले पाहिजे, यासाठी प्रत्येक विभागाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सुविधांचाही सविस्तर आढावा घेतला. पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक उपचार केंद्रे, रुग्णवाहिका, डॉक्टरांची पथके आणि औषधसाठा यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या वारीत प्रथमच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत आणि जीवितहानी टाळता यावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे यंदाची वारी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वीजपुरवठ्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. आजपासून वारी संपेपर्यंत वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणने लोडशेडिंग पूर्णपणे बंद ठेवावे आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुक्कामस्थळे, मंदिर परिसर, रस्ते, वैद्यकीय केंद्रे आणि इतर आवश्यक सेवांना सातत्याने वीज उपलब्ध राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वारकऱ्यांच्या दर्शन व्यवस्थेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वारकरी हाच खरा व्हीआयपी आहे.” त्यामुळे सर्वसामान्य वारकऱ्यांना लवकर आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी यंदाही व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंदच ठेवण्यात येणार आहे. शासनाची प्राथमिकता ही सर्वसामान्य भाविकांना सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध करून देण्याची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वारीसाठी आवश्यक निधीच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देताना त्यांनी सांगितले की, नगरविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच राज्य परिवहन विभागाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. नगरपरिषदेस मलनिस्सारण योजना, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक, दर्शन मंडप तसेच शहरातील विविध विकासकामांसाठी एकूण ६७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास अधिक वेगाने होईल आणि भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
शहरातील वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आषाढी वारीदरम्यान लाखो वाहनांची आणि भाविकांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच मंदिर समितीसाठी मंजूर करण्यात आलेली नवीन रुग्णवाहिका दुसऱ्या दिवशी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे रेडी मिक्स काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील दिवसांत तातडीने बुजविण्याचे आदेश त्यांनी दिले. वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेसाठी रस्ते सुस्थितीत असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध तयारीची सविस्तर माहिती सादर केली. वारीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा दिला. मुख्याधिकारी महेश रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शाम कुंभार, गटविकास अधिकारी अमोल जाधव आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनीही आपल्या विभागांतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती बैठकीत सादर केली.
बैठकीच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याचे आवाहन केले. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा अनमोल वारसा असून, या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सेवा मिळणे हे शासनाचे सर्वोच्च ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा, पोलीस, परिवहन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून यंदाची आषाढी वारी आदर्श आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
