सोलापुर : आषाढी शुद्ध एकादशी चा पार्श्वभूमीवर मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन सुरू होणार आहे. या पारंपरिक आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या पालखी सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून, प्रत्येक मानाच्या पालखीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालख्यांचा मुक्काम, विसावा, रिंगण स्थळे तसेच संपूर्ण मार्गावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखांशी सातत्याने समन्वय ठेवून ‘टीम वर्क’च्या भावनेतून जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.
मानाच्या पालख्यांसाठी नियुक्त नोडल अधिकारी, सहाय्यक अधिकारी तसेच शौचालय व्यवस्थेच्या पाहणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अमोलसिंह भोसले, सुमित शिंदे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सैफन शेख, तहसीलदार सरस्वती पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. तसेच पालखी व्यवस्थापनासाठी नियुक्त सर्व अधिकारी ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले की, प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. आजपासूनच संबंधित पालखी प्रमुखांशी संपर्क साधून आवश्यक समन्वय सुरू करावा. पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी पालखीसोबत राहून मुक्काम, विसावा आणि रिंगण स्थळांची नियमित पाहणी करावी. त्याचबरोबर पालखी मार्गावरील रस्त्यांची तपासणी करून कुठेही अडचण आढळल्यास ती तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालखीच्या स्वागताबाबतही त्यांनी विशेष सूचना दिल्या. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पालखी प्रवेश करताच संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी पालखीचे यथोचित स्वागत करण्याची जबाबदारी पार पाडावी. वारकऱ्यांना प्रशासनाचा सकारात्मक अनुभव मिळावा, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालखी जिल्ह्यात आल्यानंतर संबंधित नोडल अधिकारी पालखीसमवेतच राहणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी रात्री आणि पहाटेच्या वेळेत वीज, पाणी आणि शौचालयाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याबाबत आधीच माहिती घेणे आणि तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणतीही समस्या निर्माण होण्यापूर्वी तिचे निराकरण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या वारीत स्वच्छता आणि शौचालय व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मागील वर्षातील अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने स्वतंत्र दोन पथकांच्या माध्यमातून 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पुण्यापासूनच राहून संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत.
या अधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी म्हणजे मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी पुरवठादारांनी उपलब्ध करून दिलेल्या शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी करणे, ती वापरण्यायोग्य आणि स्वच्छ असल्याची खात्री करणे तसेच पुढील मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक शौचालये वेळेत पोहोचतील यासाठी पुरवठादारांशी सातत्याने संपर्क ठेवणे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दिवसातून तीन वेळा सकाळी, दुपारी आणि रात्री प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा अहवाल देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले की, वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या यशामागे प्रभावी समन्वय आणि जबाबदारीची जाणीव महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले काम केवळ प्रशासकीय कर्तव्य म्हणून नव्हे, तर एकत्रित ‘टीम वर्क’ म्हणून पार पाडणे गरजेचे आहे. पालखी प्रमुख, स्थानिक प्रशासन, विविध विभाग आणि पुरवठादार यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राहिल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि वारकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मानाच्या पालख्यांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा दिला. त्यांनी पालखी प्रमुखांशी समन्वय, पुण्यापासून शौचालय व्यवस्थेची पाहणी, पुरवठादारांशी संपर्क आणि विविध अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करून अत्यंत दक्षतेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यंदाच्या आषाढी वारीसाठी प्रशासनाने नियोजन, सुविधा, स्वच्छता आणि समन्वय या चार प्रमुख बाबींवर विशेष भर दिला असून, लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुविधायुक्त व्हावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
