सांगोला : नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक ५ वरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर यश आले आहे. फलटण येथील शाखा अभियंता श्री. रा. प. मोरे यांनी सांगोला येथील आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी फाटा क्रमांक ५ ला टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १९ ऑगस्ट २०२६ पासून फाटा क्रमांक ५ ला १५० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ऑगस्टपासून आणखी ७५ क्युसेक पाण्याची वाढ करून एकूण २२५ क्युसेक पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या निर्णयामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सांगोला परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाल्यास पिकांना मोठा फायदा होणार असून, पाण्याअभावी निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर होईल, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांची भेट
पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, सांगोला येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णयाची माहिती देण्यात आली.
आंदोलनस्थळी उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये उपविभागीय अभियंता श्री. रा. म. धोत्रे, उपविभागीय अभियंता श्री. श्रीरंग टवरे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. अभिजीत नवले आणि कनिष्ठ अभियंता श्री. दि. बु. तांबडे यांचा समावेश होता.
