सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील महूद रोड बायपास परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला अडवून मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सांगोला शहरासह परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी सचिन तुळशीराम महांकाळ यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, या घटनेत सात अनोळखी व्यक्तींनी सहभाग घेतला असून, त्यापैकी एका व्यक्तीला फिर्यादीने पूर्वीपासून ओळखत असल्याचे नमूद केले आहे.
फिर्यादी सचिन महांकाळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून व्यवसायाच्या कामानिमित्त ते नियमितपणे चिंचोली रोड, महूद रोड तसेच संबंधित बायपास परिसरात ये-जा करतात. सुमारे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते महूद रोड बायपास येथील जिजाऊ पार्क परिसरात वॉकिंग करण्यासाठी गेले होते.
याचदरम्यान त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. फिर्यादीनुसार, या गाडीतून सुमारे सात अनोळखी व्यक्ती खाली उतरल्या आणि सचिन महांकाळ यांच्याजवळ येऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते घाबरले. काही व्यक्तींनी त्यांना पकडून ठेवले, तर एकाने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस पाठीच्या रंग्याच्या पाइपने जोरात मारहान करण्यात आली
या मारहाणीमुळे सचिन महांकाळ यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू काढून देण्याची मागणी केली. विरोध केल्यास आणखी मारहाण करण्याची धमकी देत त्यांच्याकडून जबरदस्तीने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने काढून घेतले
आरोपींनी त्यांच्या पँटच्या खिशातील ४० हजार रुपये रोख रक्कम, गळ्यातील दीड तोळे वजनाची सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तसेच बोटातील अंदाजे एक तोळे वजनाची सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. अशाप्रकारे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.
लूट केल्यानंतर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसून मंगळवेढा-सोलापूर रोडच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले. घटनेनंतर जखमी अवस्थेत सचिन महांकाळ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी येऊन त्यांची विचारपूस केली.
मारहाणीत डोक्याला तसेच पाठीच्या भागाला दुखापत झाल्याने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. घटनेनंतर त्यांनी सांगोला पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
आरोपींपैकी काही व्यक्तींचे चेहरे व त्यांना आठवत असून, त्यापैकी एका व्यक्तीला त्यांनी ओळखल्याचे सांगितले आहे. व्यक्तीचे नाव ईश्वर पांडुरंग पवार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा व्यक्ती यापूर्वी एका प्रकरणात सांगोला ग्रामीण पोलिस ठाण्यात उपचारासाठी आणलेल्या व्यक्तीला पाहिल्याने ओळखीचा झाल्याचे पोलिसांना सांगितले
घटनेनंतर पोलिसांनी फिर्यादीकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्कॉर्पिओ वाहन, घटनास्थळ, परिसरातील संभाव्य सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपींच्या हालचालींच्या आधारे तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. महूद रोड बायपास, जिजाऊ पार्क परिसर आणि मंगळवेढा-सोलापूर मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते.
या घटनेमुळे महूद रोड बायपास आणि परिसरातील रात्रीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या भागात नागरिकांची ये-जा असतानाही अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला अडवून मारहाण करून लूट केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी निर्जन किंवा कमी वर्दळीच्या रस्त्यांवर गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन लुटलेला मुद्देमाल परत मिळवावा आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आरोपींची ओळख, वाहनाची माहिती आणि लुटलेल्या मुद्देमालाचा शोध घेणे हे तपासातील महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत.
