पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. अत्यंत नियोजनबद्ध, व्यापक आणि सेवाभावी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पाश्वभूमीवर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारीतील सेवाभावाची परंपरा अधिक बळकट झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत आषाढी वारी हे अद्वितीय स्थान आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी भगव्या पताका, तुळशीची माळ, टाळ-मृदंगाचा गजर आणि “विठ्ठल विठ्ठल” या अखंड नामस्मरणात पंढरीकडे प्रस्थान करतात. जात, धर्म, भाषा, आर्थिक स्थिती यांचे सर्व भेद विसरून भक्तीच्या एका धाग्यात बांधले जाणारे हे वारकरी अनेक दिवस पायी प्रवास करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात. अशा वारकऱ्यांच्या पायातील वेदना कमी व्हाव्यात, त्यांच्या प्रवासाला आधार मिळावा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या भावनेतून चरणसेवा ही संकल्पना उदयास आली.
या सेवाभावी उपक्रमाची प्रेरणा शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारांतून मिळाली. त्यांनी सुमारे दीड दशकापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या पायांना आयुर्वेदिक तेल लावणे, मालिश करणे आणि थकवा दूर करण्यासाठी चरणसेवा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. ही संकल्पना वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आणि पुढे ती सेवेचा आदर्श ठरली.
या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी या सेवाभावी संकल्पनेचे महत्त्व ओळखले. वारकरी सेवेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून राज्यभर अशा प्रकारची चरणसेवा शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज राज्यातील विविध भागांमध्ये हजारो स्वयंसेवकांच्या माध्यमातून ही सेवा राबविली जात असून वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नक्षत्र मंगल कार्यालयात भव्य चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात ५० हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. स्वयंसेवकांनी वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेल लावून मालिश केली, पाय चेपले तसेच प्रवासामुळे होणारा थकवा कमी करण्यासाठी आवश्यक सेवा पुरविली. याशिवाय वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील स्वतः दोन दिवस उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा करत होते. त्यांच्या सहभागामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेकडो स्वयंसेवक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी अत्यंत समर्पित भावनेने या शिबिरात सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात सेवाभावाचे दर्शन घडले.
वारकरी, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. चरणसेवा आणि आरोग्यसेवा या दोन्ही उपक्रमांचा लाभ हजारो वारकऱ्यांना मिळाल्याने या शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या सेवाभावी कार्याचे विशेष अभिनंदन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी वारकरी सेवेची ही परंपरा भविष्यात आणखी व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. समाजातील सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वारकरी परंपरेतील ही चरणसेवा आता केवळ एका गावापुरती किंवा एका संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्यव्यापी लोकचळवळ बनत आहे. सेवाभाव, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला नवे बळ मिळत असून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलत आहे.
