प्रवीण शिवपूजे : विद्यार्थ्यांना झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या घटनेचा निषेध तसेच NEET परीक्षा प्रकरणातील न्यायाच्या मागणीसाठी दिलेल्या सांगोला बंदला आज शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
आज सकाळपासून शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुपारी बारा वाजता महात्मा फुले चौक येथून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष वागणुकीचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, दिल्ली येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
सांगोला तालुका हा अन्यायाविरोधात कायम ठाम भूमिका घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. जात, धर्म, पक्षीय भेद विसरून अन्यायाविरोधात एकत्र येण्याची परंपरा सांगोलकरांनी पुन्हा एकदा कायम ठेवली, असे चित्र आजच्या बंददरम्यान पाहायला मिळाले.
मोर्चानंतर तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
