पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी हाच खरा व्हीआयपी असून त्यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात विठ्ठल मंदिरात इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला थेट दर्शनाची सुविधा दिली जाणार नाही. वारकऱ्यांना सहज, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील विविध सुविधा, पालखी तळ तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेत वारकऱ्यांच्या सेवेलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “पंढरपूरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा आदर करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. वारकरी हा केवळ भाविक नसून विठ्ठलाचा खरा मानकरी आहे. त्यामुळे त्यालाच व्हीआयपी मानून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मंदिरातील दर्शन व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा विशेषाधिकार ठेवला जाणार नाही. वारकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना दर्शन घेता यावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
यंदाच्या आषाढी वारीसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख मार्ग, पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालये, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि प्रकाशयोजना यांसह विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पंढरी नगरीला आकर्षक स्वरूप देण्यासाठी स्वागत कमानी, सजावट आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात आल्या असून वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.
वारकऱ्यांच्या कोणत्याही अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आषाढीच्या निमित्ताने येणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला काहीही अडचण आल्यास त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन किंवा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. “जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मी स्वतः वारकऱ्यांच्या सेवेसाठी टोल-फ्री क्रमांकाप्रमाणे उपलब्ध राहू. प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेऊन ती सोडवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी पालखी तळाची सविस्तर पाहणी करून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. आषाढी शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या दाखल होणार आहेत. नवमीच्या दिवशी वाखरी येथे अनेक पालख्यांचा मुक्काम असल्याने या ठिकाणी लाखो वारकरी एकत्र येतात. त्यामुळे पालखी तळावर कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे वाखरी पालखी तळावरील काही भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, तेथे सिमेंट पाईप टाकून पाण्याचा योग्य निचरा करावा, आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करून उतार तयार करावा तसेच एकही खड्डा राहणार नाही, याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.
वारकरी भाविकांच्या मुक्कामासाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पालखी तळावर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, आरोग्य केंद्रे, तात्पुरती शौचालये, कचरा व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा सक्षमपणे उपलब्ध राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांनी नेमून दिलेली कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल. सुविधांच्या उभारणीसाठी अधिक निधीची आवश्यकता भासल्यास तो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक पंढरपूरात दाखल होत असल्याने वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक सेवा देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व संबंधित यंत्रणांनी आषाढी वारीच्या यशस्वी नियोजनासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
