मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना सुरक्षित, निरोगी आणि सुखकर वारीचा अनुभव मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अनेक दिवस पायी प्रवास करून पंढरपूर गाठतात. या प्रदीर्घ प्रवासात पायांना होणारा ताण, थकवा, फोड, स्नायूंचे दुखणे, निर्जलीकरण, पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘चरणसेवा’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
यंदा राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी सेवा केंद्रे उभारण्यात आली असून, या केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहेत. प्रत्येक सेवा केंद्रावर प्राथमिक आरोग्य तपासणी, तातडीचे उपचार, फिजिओथेरपी, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना आराम मिळावा यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाचा वापर करून पायांची मालिश करण्यात येणार आहे. याशिवाय फिजिओथेरपीद्वारे स्नायूंचा ताण कमी करणे, वेदना नियंत्रण, चालण्यामुळे होणाऱ्या त्रासावर उपचार तसेच पायांवरील जखमा, फोड आणि इतर किरकोळ दुखापतींवर त्वरित उपचार करण्यात येणार आहेत. आरोग्यसेवा केंद्रांवर आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला असून, गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
वारीदरम्यान केवळ उपचारांपुरता हा उपक्रम मर्यादित नसून जनजागृतीलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पालखी मार्गावर आठ आरोग्य जनजागृती रथ कार्यरत राहणार असून, त्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, सुरक्षित पिण्याचे पाणी, संतुलित आहार, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शनही वारकरी व नागरिकांना दिले जाणार आहे. निवडक मुक्कामस्थळी योगसत्रांचे आयोजन करून शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गतवर्षी ‘चरणसेवा’ उपक्रमाला वारकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून १ लाख ७५ हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट चरणसेवा, वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात यश आले.
ते पुढे म्हणाले की, यंदा उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांतील सुमारे ४०० सेवा केंद्रांवर प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक सातत्याने कार्यरत राहणार आहेत. याशिवाय ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, अत्यावश्यक औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा आणि आठ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविणे आणि वारीदरम्यान कोणत्याही आरोग्यविषयक अडचणींवर तातडीने उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वारकरी संप्रदायातील सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीला आधुनिक आरोग्यसेवेची जोड देणारा ‘चरणसेवा’ उपक्रम हा केवळ वैद्यकीय सेवा पुरविणारा कार्यक्रम नसून, समाजसेवेचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. वारीच्या आध्यात्मिक वातावरणात आरोग्य संवर्धनाचा संदेश पोहोचविताना वारकऱ्यांना आवश्यक उपचार, सल्ला आणि मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख तसेच पालखी मार्गावरील नागरिकांना ‘चरणसेवा’ उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, निरोगी आणि सुखकर व्हावा, यासाठी शासन, वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्वयंसेवक यांचे संयुक्त प्रयत्न यंदाच्या आषाढी वारीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
