सांगोला : सांगोला नगरपालिकेतील विद्युत विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. संबंधित विद्युत अभियंत्याच्या गेल्या दोन वर्षांतील सर्व कामांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे.
‘हम करे सो कायदा’ : अभियंत्याचा कारभार
मिळालेल्या माहितनुसार, संबंधित अभियंत्याने पदभार स्वीकारल्यापासून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने कारभार सुरू ठेवला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींना किंवा अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जात असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकाभिमुख तत्त्वांना धक्का बसत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या हितापेक्षा स्वतःच्या मर्जीप्रमाणे कामकाज चालवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
दरम्यान, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, प्रत्येक कामामध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांच्या कामातही अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आले असून, यासाठी संबंधित अभियंत्यालाच जबाबदार धरण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपालिकेची वीज बिले वेळेवर न भरल्यामुळे सुमारे ८ ते १० लाख रुपयांचा दंड व व्याजाचा आर्थिक भार पालिकेवर पडला आहे. ही रक्कम संबंधित अभियंत्याकडून वसूल करावी, अन्यथा पालिकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
सदर प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ कारवाई न झाल्यास, काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत प्रशासनावर दबाव वाढवण्यात आला आहे.
