Middle East Crisis: मध्य पूर्व आशियात युद्ध सुरु असल्यानं जगभरात होणारी तेल वाहतूक बाधित झाली आहे. याचा फटका जगातील सर्वच देशांना बसला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणं अतिशय जिकरीचं बनलं आहे. युद्धाच्या धामधुमीत एक तेल टँकर मुंबईत दाखल झाला आहे.
मुंबई: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसू लागला आहे. या युद्धात होर्मुझची सामुद्रधुनी ओढली गेल्यानं जगातील खनिज तेल वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. इराणनं होर्मुझमधून होणारी तेल वाहतूक रोखून धरल्यानं जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. जगभरात खनिज तेलाचे दर आभाळाला भिडले आहेत.
अनेक देशाच्या तेल टँकर्सना होर्मुझची सामुद्रधुनी पार करणं अवघड जात असताना भारताच्या पदरात पहिलं यश पडलं आहे. भारताचा एक तेल टँकर सुरक्षितपणे मुंबईत पोहोचला आहे. याबद्दलची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टनं दिली. ‘होर्मुझ सुरक्षित पार करणं अतिशय अवघड होतं. पण भारतीय कॅप्टननं समयसूचकता दाखवली आणि टँकरनं सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली’, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टनं दिली.
ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम म्हणजे काय?
ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम अर्थात एआयएस जहाजांवरील एक यंत्रणा असते. यामुळे जहाजाची ओळख, ठावठिकाणी, त्याच्या मार्गाची माहिती अन्य जहाजांकडे आणि किनाऱ्यावरील यंत्रणांकडे आपोआप पोहोचते. सागरी प्रवास सुरक्षित करणं हा यामागचा प्रमुख हेतू आहे. जहाजांचे अपघात टाळणं, सागरी टेहळणीसाठी याचा वापर होतो. एखाद्या जहाजानं ही यंत्रणा बंद केल्यास त्याचा ठावठिकाणा शोधणं जवळपास अशक्य होऊन जातं. सगळ्या व्यावसायिक जहाजांना ही यंत्रणा सुरु ठेवणं अनिवार्य असतं.
