सांगोला प्रतिनिधी : तिप्पेहळी येथील मिरज-पंढरपूर महामार्गालगत असलेल्या किराणा दुकानात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दुकानाच्या बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करत चोरट्यांनी रोख रकमेसह काजू, बदाम, खाद्यतेल, खोबरे, शेंगदाणे, चटणी, बिस्कीट, मसाले, बल्ब आणि अन्य किराणा साहित्य असा एकूण २८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी किरण हणमंत नरळे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण नरळे यांच्या तिप्पेहळी येथील शिव वस्ती परिसरात मिरज-पंढरपूर महामार्गालगत शेती आहे. याच ठिकाणी पत्र्याचे ‘गणराज किराणा स्टोअर्स’ नावाचे दुकान आहे. या दुकानातून परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे किराणा साहित्य विक्री केले जाते.
रात्री सुमारे साडेनऊ वाजता नरळे यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दुकानातील साहित्य व्यवस्थित ठेवून शटर बंद केल्यानंतर ते कुटुंबीयांसह घरी गेले. त्यानंतर कुटुंबीयांनी जेवण करून रात्री झोप घेतली. दुकान बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाला लक्ष्य केले.
किरण नरळे दुसरादिवशी दुकानाकडे गेले असता त्यांना दुकानाच्या डाव्या बाजूचा पत्रा वाकलेला असल्याचे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता पत्रा कापून दुकानात प्रवेश करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर उघडून आत पाहिले असता दुकानातील विविध वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या.
काऊंटर आणि ड्रॉवरची तपासणी केली असता त्यातील रोख रक्कम गायब असल्याचे आढळले. तसेच पाकिटाचीही चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर दुकानातील संपूर्ण मालाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर किराणा साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी केवळ रोख रकमेवरच डल्ला न मारता दुकानातील विविध महागड्या किराणा वस्तूही चोरी करून नेल्या. चोरी झालेल्या मुद्देमालामध्ये ५ किलो काजू, , ४ किलो बदाम, तसेच राजेश कंपनीच्या गोड्या तेलाचे तीन बॉक्स, ३ हजार ३०० रुपये किमतीचे माल लंपास केला
याशिवाय ५ किलो खोबरे, २ हजार रुपये, ५ किलो छोले, ५०० रुपये, आणि १० किलो शेंगदाणे, १ हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दुकानातील इतर किराणा मालाचीही मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे.
चोरट्यांनी वायरच्या पिशव्या, थंड पेय, आर.ए. कंपनीची चटणी, रिन कंपनीचे साबण, बॉरबॉन कंपनीची बिस्कीटे, सुहाना कंपनीचे मसाले, सुर्या कंपनीचे चार्जिंग बल्ब आणि इतर किराणा साहित्यही चोरून नेले.
दुकानातील मालाबरोबरच चोरट्यांनी रोख रकमेवरही हात साफ केला. दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ३ हजार रुपये, तसेच पाकिटातील ४ हजार रुपये, अशी एकूण ७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. पाकिटामध्ये ५०० रुपयांच्या नोटांसह महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामध्ये पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांचाही समावेश होता.
अशाप्रकारे किराणा साहित्य आणि रोख रक्कम मिळून एकूण २८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नरळे कुटुंबीयांनी सांगोला पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरीबाबत आवश्यक माहिती घेतली. दुकानात प्रवेश करण्यासाठी पत्रा कापण्यात आल्याने चोरट्यांनी पूर्वनियोजन करून चोरी केली होती का, याचाही तपास केला जात आहे.
चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, सांगोला पोलिसांकडून परिसरातील माहिती, उपलब्ध पुरावे आणि चोरीच्या पद्धतीच्या आधारे तपास सुरू आहे.
महामार्गालगतच्या दुकानांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच रात्रीच्या वेळी परिसरातील गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या चोरीमुळे व्यापारी आणि दुकानदारांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, दुकान बंद करताना रोख रक्कम व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
