पंढरपुरातील डी. पी. रोडच्या कामात अनियमितता; राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी

पंढरपूर / प्रतिनिधी: पंढरपूर शहरातील नगरपरिषद हद्दीत गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या डी. पी. रोडच्या कामांमध्ये मोठ्या तफावती उघड झाल्या आहेत. काही रस्ते खोदून अर्धवट सोडले असून, काही ठिकाणी मोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामध्ये कोकाटे प्राईड ते सांगोला रोड या महत्त्वाच्या रस्त्याचे काम नियमबाह्य पद्धतीने होत असल्याची माहिती समोर आली आहे.
हा रस्ता रेल्वे स्थानक, एस. टी. बस स्थानक आणि शासकीय विश्रामगृहाकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे हा रस्ता १५ मीटर रुंदीचा आणि ११०० मीटर लांबीचा नकाशा प्रमाणे पूर्ण करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली आहे.
रस्त्याची रुंदी कमी; वाहतूक कोंडीचा धोका
सुडके यांनी सांगितले की, कोकाटे प्राईडकडून सुरू होणाऱ्या या रस्त्याच्या पहिल्या ३०० मीटर भागात रस्त्याची रुंदी १५ मीटर ऐवजी १२ मीटर करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात एसटी बस व मोठ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता नकाशा प्रमाणे १५ मीटर रुंदीचा ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शासकीय मोजणी व मोबदला नाही
रस्त्याचे काम सुरू करताना शासकीय मोजणी न करता काम हाती घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या खाजगी मालकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या तरी मोबदला मिळालेला नाही, असेही सुडके यांनी नमूद केले. यामुळे संबंधित जमीनमालकांचे दुहेरी नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठेकेदारांवर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची शासन स्तरावर चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी दिगंबर सुडके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.