विशेष प्रतिनिधी : न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या शालेय बसांच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसांची स्थिती पाहता या बस भंगारातून आणल्या आहेत का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक बस पुढील, मागील तसेच बाजूच्या भागातून तुटलेल्या, फुटलेल्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता की स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी पैसा ?
“शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करून वाहतूक केली जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. नियम सर्वांसाठी समान असताना या संस्थेला वेगळे नियम लागू आहेत का? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून नेमका कोणाचा स्वार्थ साधला जात आहे?” असे प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना उपस्थित केले.
या प्रकरणात प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ने अद्याप कोणती कारवाई केली आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित बसांची फिटनेस तपासणी, आवश्यक परवानग्या, सुरक्षा नियमांचे पालन आणि विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आता आरटीओ प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी होत केली जात आहे.
