
सांगोला/ रोहित हेगडे : सांगोला शहरात गेल्या अनेक दिवसापासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे शहरात प्रत्येक गल्लोगल्ली खोदकाम सुरू आहे. एका गल्लीमध्ये तब्बल तीन ते चार वेळा खोदकाम करून ते बुजवले जात आहेत. जर एकच काम तीन-चार वेळा करायचे असेल तर त्यासाठी प्रत्येक वेळी खड्डा खणणे आणि नंतर तो बूजवून परत त्याच ठिकाणी खड्डा खणून काम करायचे याचे गूढ काय आहे ? याबाबत नागरिकांमध्ये कुजबूज सुरू आहे.
दरम्यान, या सुरू असलेल्या खोदकामामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असून, धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, दमा तसेच लहान मुलांना व्हायरल होत असून दवाखाण्यात भरती सुरू आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरात धुळीचे साम्राज्य असताना नगरपालिका मात्र नागरिकांना कोमात ठेवून जोमात त्यांचे काम करत आहे. शहरांमध्ये रस्त्याची काम असो वा नगरपालिकेच्या अश्या योजना याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळेस काम केली जातात. त्यामुळे नगरपालिकेने रात्रीच्या वेळेस काम करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
त्रस्त नागरिक :
एकाच ठिकाणी तीन ते चार वेळा खोदकाम केले. ते पुन्हा बुजवले आणि पुन्हा तेच काम केले. यामध्ये कोण किती कमिशन खात आहे? याची चौकशी होणे गरजेचे आहे. भुयारी गटार योजना हे चांगले आहे. परंतु नगरपालिकेकडून नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा यामध्ये विचार करताना दिसत नाही. ते पुन्हा कधी व्यवस्थित करतील याचा पत्ताच लागत नाही. व्यवसायिकांना मात्र त्याचा जोरदार फटका बसतोय. कारण धुळीमुळे आणि या खराब रस्त्यामुळे लोक घरातून बाहेर पडण्यास आणि खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत.
मुख्याधिकारी सुधीर गवळी इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले, सांगोला नगरपालिकेकडून धुळीचा आणि नागरिकांना होणारा त्रास हे पाहता दिवसातून दोन ते तीन वेळा टँकरद्वारे पाणी रस्त्यांना फवारले जाते. तसेच नागरिकांची वाढती गर्दी आणि ऊन यामुळे पाणी जिरपून पुन्हा धुळ वाढते. यासाठी नगरपालिकडून पाण्याच्या टँकर फेऱ्या आणि फवारणी वाढवण्यात येईल तसेच नागरिकांना होणारा त्रास यासाठी लवकरात लवकर सर्व काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात येतील. तसेच नागरिकांनी घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा, असे ते म्हणाले.