सांगोला | प्रतिनिधी : सांगोला शहरात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी एखतपूर रोडवरील बनकर वस्ती येथील सिद्धनाथ व्हरायटीज या पेढीवर तपासणी करून एकूण १९ हजार ६३४ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला.
या कारवाईमुळे सांगोला परिसरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद देण्यात आली आहे.
ऑनलाइन तक्रारीनंतर प्रशासनाची धडक
अन्न व औषध प्रशासनाला ऑनलाइन प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम यांनी पंचसाक्षीदारांसमवेत संबंधित पेढीची तपासणी केली. यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या २४ वर्षीय प्रथमेश श्रीकांत जाधव यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
तपासणीदरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विविध पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विमल, रजनीगंधासह विविध ब्रँडचा साठा
कारवाईत सुगंधित मावा, डायरेक्टर पानमसाला, विमल पानमसाला, चैनी सुगंधित तंबाखू, सुपर पानमसाला, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा, आरएमडी पानमसाला, एम सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पानमसाला, सुपर ९९ तंबाखू, शॉट प्रीमियम सुगंधित तंबाखू आणि व्ही-१ तंबाखू अशा विविध पदार्थांचा समावेश होता.
पंचांसमक्ष मोजणी केल्यानंतर या साठ्याची एकूण किंमत १९ हजार ६३४ रुपये निश्चित करण्यात आली. संबंधित पदार्थांची पुनर्विक्री किंवा मानवी सेवनासाठी वापर होऊ नये, यासाठी साठा जप्त करण्यात आला. तसेच पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी स्वतंत्र ठेवण्यात आले.
पुरवठादारांचीही चौकशी करण्याची मागणी
फिर्यादीतील माहितीनुसार, जप्त केलेला साठा विजय कलडोने (रा. आटपाडी, जि. सांगली) आणि सैफ तांबोळी (रा. सांगोला) यांच्याकडून घेतल्याचे प्रथमेश जाधव यांनी सांगितल्याचे नमूद आहे.
प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि संबंधित साठ्याचा मूळ मालक कोण आहे, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सांगोल्यातील या कारवाईमुळे प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या साठवणूक व विक्रीविरोधातील अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष वेधले गेले आहे.
