मुंबईतील प्रतिष्ठित स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जाते, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत शहरातील पाच नामांकित क्लबच्या खाद्य परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आर.के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब आणि विलींग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नसाठवणुकीतील त्रुटी आणि कालबाह्य खाद्यपदार्थांसह विविध गंभीर बाबी आढळल्याचे FDA ने म्हटले आहे.
मुंबईतील क्लब, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट अशा सात खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पाच आस्थापनांचे खाद्य परवाने निलंबित करण्यात आले, एका आस्थापनाला व्यवसाय तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, तर आणखी एका आस्थापनाला त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये धक्कादायक त्रुटी
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया हा मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक क्लब म्हणून ओळखला जातो. मात्र, FDA च्या तपासणीत क्लबच्या खाद्य विभागात अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
तसेच अन्न हाताळण्याच्या आणि कचरा व्यवस्थापनाच्या भागात झुरळे व माशांचा प्रादुर्भाव आढळल्याचे FDA ने नमूद केले. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या अन्नावर पाणी किंवा कंडेन्सेशनचे थेंब पडत असल्याचेही आढळले. याशिवाय सडलेली किंवा बुरशी लागलेली भाजीपाला सामग्री, जास्त पिकलेली मशरूम आणि कालबाह्य खाद्यपदार्थ साठवले असल्याचे तपासणीत समोर आले.
किचनच्या प्लॅटफॉर्मवर झाडू ठेवण्यात आले होते, तर काही खाद्यपदार्थांशी संपर्कात येणारी भांडी थेट जमिनीवर हाताळली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी नोंदवले. स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या रंगानुसार वेगवेगळ्या कटिंग बोर्डचा वापर न करणे, साठवलेल्या पदार्थांवर योग्य लेबलिंग नसणे आणि अशा त्रुटीही निदर्शनास आल्या. त्यामुळे अन्न दूषित होण्याचा आणि एका खाद्यपदार्थातून दुसऱ्या खाद्यपदार्थात जंतू जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियासोबतच आर.के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब आणि विलींग्डन स्पोर्ट्स क्लब यांच्या खाद्य परवान्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या क्लबमध्येही किचनमधील स्वच्छतेशी संबंधित त्रुटी, कीटक नियंत्रणातील समस्या, अन्न साठवण्याची अयोग्य पद्धत आणि खाद्य हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेबाबत कमतरता आढळल्याचे FDA च्या कारवाईतून स्पष्ट झाले. विलींग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये ड्रेनेजची योग्य देखभाल नसणे, अस्वच्छ मजले, खराब झालेली छताची रचना, तापमान नोंदींच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि स्वच्छतेच्या वेळापत्रकाचा अभाव यांसारख्या बाबीही नोंदवण्यात आल्या.
गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला व्यवसाय बंद करण्याचे आदेश
या तपासणी मोहिमेत गोरेगाव स्पोर्ट्स क्लब, मालाड पश्चिम येथील खाद्य व्यवसायावरही कारवाई करण्यात आली. संबंधित आस्थापना आवश्यक FSSAI नोंदणी किंवा परवान्याशिवाय खाद्य व्यवसाय करत असल्याचे FDA च्या तपासणीत आढळले. त्यामुळे या आस्थापनाला खाद्य व्यवसाय तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक परवाना आणि नोंदणी प्राप्त केल्यानंतरच खाद्य व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.
अन्नसुरक्षेबाबत FDA ची कडक भूमिका
महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून FDA कडून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब, कॅन्टीन आणि इतर खाद्य आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाने निलंबित करण्यापासून व्यवसाय बंद करण्यापर्यंतची कारवाई केली जात आहे.
अन्नसुरक्षा ही केवळ छोट्या खाद्य विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थांनाही त्याच नियमांचे पालन करावे लागते, असा संदेश या कारवाईतून मिळत आहे. ग्राहक कोणत्याही क्लबमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये भोजन करत असताना अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत विश्वास ठेवतात. त्यामुळे अशा ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
दरम्यान, संबंधित क्लबना आढळलेल्या त्रुटी दूर करून अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. FDA च्या निकषांनुसार सुधारणा झाल्यानंतर पुढील नियामक प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील या प्रतिष्ठित क्लबवर झालेली कारवाई केवळ एका तपासणीपुरती मर्यादित न राहता शहरातील खाद्य व्यवसायांसाठीही एक महत्त्वाचा इशारा मानला जात आहे.
