देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष ठरणार असून, राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पारंपरिक ‘अॅट होम’ स्वागत समारंभासाठी तयार करण्यात आलेली निमंत्रण किट चर्चेचा विषय ठरली आहे. या निमंत्रण किटच्या निर्मितीत तब्बल १३० कलाकार आणि कारागिरांचा सहभाग असून, त्यामध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेशातील समृद्ध लोककला, हस्तकला आणि सांस्कृतिक परंपरांचा सुंदर अनोखा संगम करण्यात आला आहे.
यंदा भारत आपला ८०वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात १५ ऑगस्टच्या संध्याकाळी ‘अॅट होम’ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेली निमंत्रण किट केवळ औपचारिक निमंत्रण नसून, देशाच्या विविध भागांतील कला आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणारी कलाकृती म्हणून तयार करण्यात आली आहे.
तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार झाली निमंत्रण किट
या विशेष निमंत्रण किटच्या निर्मितीसाठी सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ काम करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील अधिकारी आणि अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन यांच्या टीमने या संकल्पनेवर काम केले. डिझायनर, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध राज्यांतील पारंपरिक कारागिरांनी एकत्रितपणे या किटची निर्मिती केली.
NIDचे संचालक अशोक मंडल यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पात सहभागी असलेल्या सुमारे १३० जणांमध्ये छत्तीसगडमधील परिसरातील जवळपास ५० कारागिरांचा समावेश होता. हा परिसर पूर्वी नक्षलवादामुळे प्रभावित होता. या भागातील कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे, हा या संकल्पनेमागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
चार राज्यांच्या लोककलेचा अनोखा संगम
निमंत्रण किटमध्ये छत्तीसगड, गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या चार राज्यांच्या कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक राज्याची स्वतंत्र ओळख, स्थानिक जीवनपद्धती आणि पारंपरिक कलाकुसर यांचा या किटमध्ये विचार करण्यात आला आहे.
छत्तीसगडच्या बस्तर भागातील पारंपरिक ढोकरा कास्टिंग कलेचा वापर करण्यात आला आहे. ही भारतातील प्राचीन धातुकामाच्या परंपरांपैकी एक मानली जाते. त्याचबरोबर बस्तरमधील लोखंडी हस्तकलेचेही दर्शन या किटमधून घडते.
विशेष म्हणजे या वस्तू तयार करताना अनेकदा साच्याचा वापर न करता लोखंडी सळ्या किंवा पत्र्यांना हाताने आकार दिला जातो. निमंत्रणासोबत देण्यात आलेली लोखंडी घंटादेखील बस्तरमधील आदिवासी लोहारांनी हाताने तयार केली आहे. त्यामुळे निमंत्रण किटला कलात्मकतेसोबतच पर्यावरणपूरक आणि स्थानिक हस्तकलेचा स्पर्श मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या लोककलेचीही झलक
या संपूर्ण संकल्पनेत महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेलाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष महेश्वरी स्टोलमध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक करवत काठी साडीच्या किनारीचा डिझाइन समाविष्ट करण्यात आला आहे.
एका स्टोलमध्ये चार वेगवेगळ्या राज्यांच्या वस्त्रपरंपरांचा संगम करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करवत काठी साडीची किनार, गोव्याच्या कुणबी साडीची रुद्राक्ष पट्टी, मध्य प्रदेशातील महेश्वरी विणकामातील कांगडा डिझाइन आणि छत्तीसगडच्या पनिका परंपरेतील चिंटा चौक डिझाइन यांचा वापर करण्यात आला आहे.
गोव्याच्या ‘खजान’ परिसंस्थेचे दर्शन
निमंत्रण किटमध्ये गोव्याच्या ‘खजान’ परंपरेचेही चित्रण करण्यात आले आहे. खारफुटीची जंगले, किनारी आर्द्रभूमी आणि समुदायांच्या सहभागातून विकसित झालेली ही पारंपरिक व्यवस्था गोव्याच्या पर्यावरणीय आणि कृषी संस्कृतीशी जोडलेली आहे.
खजान परिसरामुळे भातशेती, मासेमारी तसेच मीठनिर्मिती यांसारख्या उपजीविकांना आधार मिळतो. त्यामुळे या कलेच्या माध्यमातून गोव्याची निसर्गाशी जोडलेली जीवनशैलीही दाखवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील बियाणे संवर्धनाची परंपरा
मध्य प्रदेशातील भिल्ल चित्रकलेतून स्थानिक बियाणे संवर्धनाची परंपरा दाखवण्यात आली आहे. स्थानिक हवामान आणि अन्नव्यवस्थेला अनुकूल असलेल्या धान्य, डाळी आणि भाज्यांच्या पारंपरिक वाणांचे जतन करण्याची पद्धत या कलाकृतीतून मांडण्यात आली आहे.
भिल्ल चित्रकला ही मध्य प्रदेशातील जिवंत आदिवासी कला परंपरांपैकी एक आहे. निसर्ग, दैनंदिन जीवन आणि सांस्कृतिक कथांना बिंदूंच्या आकर्षक रचनांमधून साकारण्याची या कलेची खास शैली आहे.
१५ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात विशेष सोहळा
१५ ऑगस्टच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणारा ‘अॅट होम’ समारंभ या संपूर्ण संकल्पनेचा केंद्रबिंदू असेल. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना भारतातील विविध राज्यांच्या लोककला, हस्तकला, पर्यावरणीय परंपरा आणि सांस्कृतिक विविधतेला एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनाची निमंत्रण किट तयार करण्यासाठी १३० कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि चार राज्यांच्या लोककलेचा केलेला समावेश यामुळे यंदाचा सोहळा केवळ राष्ट्रीय उत्सव न राहता भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणारा ठरणार आहे.
