सांगोला प्रतिनिधी: सांगोला तालुक्यात बेकायदेशीररीत्या गर्भवती महिलांची सोनोग्राफी करून गर्भाचे लिंग निश्चित केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वाकी शिवणे परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे साहित्य, मोबाईल हँडसेट, चार्जर यासह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम, 1994 अर्थात PCPNDT Act अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत ग्रामीण रुग्णालय सांगोला येथील वैद्यकीय अधीक्षक तथा PCPNDT कायद्यांतर्गत समुचित प्राधिकारी यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाकी शिवणे येथील एका घरामध्ये बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भाचे लिंग निश्चित केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईची तयारी केली. फिर्यादीसोबत वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी तसेच सांगोला पोलिसांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून तपासणी केली.
कारवाईदरम्यान संबंधित घरात गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मोबाईल हँडसेट आणि 80W SuperVOOC चार्जर यांचा समावेश आहे. हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
छाप्याच्या वेळी संबंधित ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलेची चौकशी करण्यात आली. तिने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलांची सोनोग्राफी करून गर्भाचे लिंग सांगण्यासाठी सुमारे 15 हजार रुपये घेतले आहेत. या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकारामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही व्यक्ती संगनमताने गर्भवती महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भाचे लिंग निश्चित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता पोलिस तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.
तपासादरम्यान एका व्यक्तीने एजंटच्या माध्यमातून जिल्ह्यातील परिसरातून संबंधित उपकरण घेतल्याची माहिती दिली आहे आहे. उपकरण देणाऱ्या व्यक्तीकडून ते प्रशिक्षण घेत असल्याचा दावाही करण्यातआला आहे.
या माहितीमुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ सांगोला तालुक्यापुरती मर्यादित आहे की त्यामागे आणखी मोठे नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास होण्याची शक्यता आहे. उपकरण कोठून आणण्यात आले, त्याचा यापूर्वी किती वेळा वापर झाला, किती गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग होता, अशा अनेक बाबींचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतात गर्भाचे लिंग निवडणे किंवा कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान करणे प्रतिबंधित आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम, 1994 अंतर्गत कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गर्भाचे लिंग सांगण्यास कायद्याने मनाई आहे.
या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे पारंपरिक सोनोग्राफी मशीनऐवजी तुलनेने सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणाऱ्या उपकरणांचा वापर झाल्याचा संशय आहे. जप्त केलेल्या USG Probe आणि मोबाईलसह अन्य उपकरणांची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच त्यांचा नेमका वापर कसा करण्यात आला होता, हे स्पष्ट होणार आहे
तपास यंत्रणेसमोर आता या उपकरणातील डिजिटल माहिती तपासण्याचेही आव्हान आहे. मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश, संपर्क क्रमांक तसेच इतर डिजिटल पुरावे तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यातून या प्रकाराची व्याप्ती आणि आणखी संबंधित व्यक्तींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे.
बेकायदेशीर गर्भलिंग निदानासारखा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे अशा प्रकारे गुप्तपणे सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पुढील तपासातून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, किती महिलांची अशा पद्धतीने तपासणी झाली आणि यामागे मोठे नेटवर्क आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
