मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरा, अध्यात्म, संस्कृती आणि वारकरी संप्रदायाच्या वैभवशाली परंपरेचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा‘ या माहितीपटाचा भव्य प्रीमियर शो मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या माहितीपटाच्या प्रीमियरला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच वारकरी परंपरेचे अभ्यासक उपस्थित होते.
या सोहळ्यास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रीमियर शोदरम्यान उपस्थितांनी माहितीपटाचे विशेष कौतुक केले. केवळ दृश्य माध्यमातून माहिती देण्यापुरता मर्यादित न राहता हा माहितीपट प्रेक्षकांना प्रत्यक्ष पंढरपूर वारीचा अनुभव देणारा असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. चित्रपटगृहात बसूनही वारकऱ्यांच्या दिंड्या, टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा गजर, संतांच्या अभंगांचा स्वर आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव आल्याचे अनेक उपस्थितांनी सांगितले. जणू काही पंढरपूरची वारीच चित्रपटगृहात अवतरली असल्याची भावना या माहितीपटाने निर्माण केली, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक समता, मानवता, बंधुभाव आणि लोकसंस्कृतीचा अनोखा उत्सव आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी रुजविलेल्या वारकरी परंपरेतील मूल्ये आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. या परंपरेचा इतिहास, आध्यात्मिक वारसा आणि लाखो वारकऱ्यांच्या अखंड श्रद्धेचे प्रभावी चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे.
माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार छायांकन, प्रभावी ध्वनीमुद्रण आणि संशोधनाधारित माहिती यांच्या साहाय्याने वारीचा अनुभव अधिक जिवंत आणि प्रभावी स्वरूपात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे देश-विदेशातील प्रेक्षकांनाही पंढरपूर वारीची वैशिष्ट्ये आणि तिच्यामागील आध्यात्मिक विचार समजून घेण्यास मदत होणार आहे.
‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा सुमारे २२ मिनिटांचा माहितीपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर प्रभावी सादरीकरण करण्याच्या उद्देशाने या निर्मितीची आखणी करण्यात आली आहे.
हा माहितीपट मराठीसह इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ प्रमुख भाषांमध्ये डब करण्यात आला असून त्यामुळे देशातील विविध भाषिक प्रेक्षकांपर्यंत वारीची परंपरा पोहोचणार आहे. बहुभाषिक प्रसारणामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
या माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी समूहाच्या विविध लोकप्रिय उपग्रह वाहिन्यांवर करण्यात येत आहे. डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो अशा नऊ वाहिन्यांवरून हा माहितीपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील लाखो प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे दर्शन घडणार आहे.
उपस्थित मान्यवरांनी या माहितीपटाच्या निर्मितीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे दर्जेदार माहितीपट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वारकरी संप्रदायातील श्रद्धा, समर्पण, समता आणि भक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडणारा हा माहितीपट केवळ धार्मिक परंपरेचे चित्रण करत नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेचेही दर्शन घडवितो. आधुनिक माध्यमांच्या साहाय्याने संतपरंपरेचा संदेश नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा माहितीपट एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
