सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ एक दुर्दैवी अपघात घडला. म्हसवड-पंढरपूर मार्गावर भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जणांना स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्याचे तसेच विहिरीतून मृतदेह काढण्यात आले.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये 4 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, विहिरीला संरक्षणासाठी कठडे नसल्याने वाहन थेट पाण्यात कोसळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
—————–
